PM Modi Pannun Case : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विदेशातून भारतविरोधी कारवाया करून हिंसाचाराला प्रोत्साहन !
|
नवी देहली – अमेरिकी यंत्रणांनी तेथील खलिस्तानवादी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारत सरकारचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यासंदर्भात एका भारतियाला अटक करण्यात आली असून हे सर्व आरोप आरोपपत्रात नमूदही करण्यात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच भाष्य केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, जर कुणी या संदर्भातील पुरावे सादर केले, तर मी निश्चितच या प्रकरणात लक्ष घालीन. जर भारताच्या कुठल्या नागरिकाकडून काही चांगले अथवा वाईट घडले असेल, तर आम्ही त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी सिद्ध आहेत. कायद्याच्या राज्यासाठी आम्ही बांधील आहोत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, असे असले, तरी विदेशात आश्रय घेऊन रहाणार्या व्यक्तींकडून देशविरोधी कारवाया केल्या जात असून त्याविषयी आम्हाला चिंता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या घटकांकडून हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे. हत्येच्या कटातील आरोपांवरून उभय देशांमधील संबंध ताणले जाण्याच्या शक्यतेला या वेळी पंतप्रधानांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, अशा प्रकरणांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर परिणाम होणार नाही. हे संबंध सुदृढ व्हावेत, यासाठी दोन्ही बाजूंनी पूर्ण योगदान दिले जात आहे. संरक्षण आणि आतंकवादविरोधी लढ्यासंदर्भात सहकार्य, हे आमच्या मैत्रीचे महत्त्वाचे घटक आहेत.