‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’स ३ कोटी रुपयांचा निधी ८ दिवसांमध्ये वर्ग करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील प्रश्न
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’च्या बांधकामासाठीचे ३ कोटी रुपये ८ दिवसांमध्ये वर्ग करू, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले. ‘वारणाली मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’स विविध अत्याधुनिक सोयी-सुविधांसह कार्यान्वित करण्याविषयीचा तारांकित प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.
सामंत या वेळी म्हणाले, ‘‘या ‘वारणाली रुग्णालया’त केंद्राच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ६ कोटी रुपये संमत झाले आहेत. त्याचा सर्व निधी आवश्यकतेनुसार वर्ग करू. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे ६ ॲलोपॅथिक विभाग, २ कुटुंब कल्याण केंद्रे, २ प्रसूतीगृहे आणि १ आयुर्वेदिक दवाखाना असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. यांपैकी प्रसूतीगृहांमधून गरोदर मातांना आंतरुग्ण सेवा देण्यात येते. मात्र इतर रुग्णांकरता आंतरुग्ण विभाग असलेले रुग्णालय नाही. ते रुग्ण पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज या ठिकाणी पाठवण्यात येतात.’’