श्री शनैश्वर देवस्थानमध्ये झालेला अपहार आणि नियमबाह्य गोष्टींचे अन्वेषण करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री
२ मासांमध्ये अहवाल मागवून घेऊ
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे मागील १० वर्षांचे स्वतंत्र लेखापरिक्षण करू. तेथे झालेला अपहार आणि नियमबाह्य गोष्टींचे सचिव दर्जाच्या अधिकार्यांच्या माध्यमातून अन्वेषण करू. त्याचा अहवाल २ मासांमध्ये मागवून घेऊ, असे आश्वासन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिले. भाजपचे आमदार चंद्रशेखर बानवकुळे यांनी श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी लक्षवेधी उपस्थित केली त्या वेळी ते बोलत होते.
सौजन्य भारत एक्सप्रेस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या अन्वेषणामध्ये विसंगती दिसून येते. ते करत असतांना नियमांचे, आकृतीबंधाचे पालन केले गेले नाही. तसेच धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊ की, असे अन्वेषण करणे योग्य नाही.’’
‘शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होती’, अशा आस्थांच्या ठिकाणी अनिर्बंध कारभार चालू असेल, तर ते चूक आहे. काही लोक आस्तिक असतात, तर काही नास्तिक असतात. आम्ही आस्तिक लोक आहोत, देव मानणारे लोक आहोत. आमची शनिदेवावर, धर्मावर, देवदेवतांवर श्रद्धा आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त होईल !
फडणवीस म्हणाले की, ‘श्री शनैश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८’ हा कायदा लागू करण्यात यावा, असा ठराव सभागृहामध्ये संमत करण्यात आलेला आहे. ज्या दिवशी आपण कायद्यावर ‘नोंदणी दिनांक’ (अपॉईमेंट डेट) लिहू त्या दिवशी, जे आहे ते संचालक मंडळ किंवा विश्वस्त बरखास्त होतील आणि आपण जे नेमू ते कारभार पहातील. त्यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या चर्चा करून त्वरित परिपत्रक काढू.
आमदार कपिल पाटील म्हणाले, ‘‘शनिशिंगणापूर येथे शनिमहाराज इतके पॉवरफूल आहेत की, तेथे घरांना दारे नाहीत, उघडे असतात; परंतु तेथे चोरी होत नाही; मात्र त्यांच्या देवस्थानातील, त्यांचे पुजारी त्यांच्या देखत चोरी करतात, म्हणजे शनिदेवाची पॉवर अल्प झाली का ?’’ तेव्हा भाजपच्या आमदारांनी या विधानाचा निषेध व्यक्त केला. |