‘शिवसेनेच्या भक्ती-शक्ती संवाद यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा जागर
ठाणे, २० डिसेंबर (वार्ता.) – स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर पाऊल टाकत आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील विविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्रे आणि सर्व कीर्तनकार, प्रवचनकार अन निरुपणकार, गावोगावी असणारी भजन मंडळे यांच्या समवेत शक्तीचा जागर करण्यात येणार आहे. हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणारे तमाम युवक, गोरक्षक आणि ज्येष्ठ यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘भक्ती-शक्ती संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ही यात्रा महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यांत प्रवास करणार आहे.
प्रत्येक दिवसाची सांगता सहस्रो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. या वेळी त्यांच्या समवेत विविध पंथांचे प्रचारक आणि संतांचे वंशजही असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण अशा ५ टप्यांत ही संवाद यात्रा होईल. संवाद यात्रेसाठी शिवसेना सचिव संजय मोरे आणि माध्यम समन्व्यक दिनेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले, असे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले. आध्यात्मिक क्षेत्रासाठी असा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात होत असल्याने आध्यात्मिक क्षेत्रातूनही याचे स्वागत केले जात आहे.