Parents Immoral Relationship : पालकांचे अनैतिक संबंध मुलांच्या तणावाचे कारण – समुपदेशनातून माहिती झाली उघड !
पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) : तरुण आणि प्रौढ यांच्यामधील अनैतिक संबंध झपाट्याने वाढले आहेत. मुलांच्या मानसिक आजाराचे पालकांचे अनैतिक वैवाहिक संबंध हे प्रमुख कारण आहे, अशी माहिती मानसशास्त्रज्ञ डॉ. केतकी परोब यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘पूर्वीही तरुण आणि प्रौढ यांच्यामधील अनैतिक संबंध होते; मात्र आता याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. मुलांना समुपदेशनासाठी आणणार्या ६० ते ७० टक्के पालकांमध्ये हे संबंध असल्याचे दिसून येते. यामुळे घरामध्ये वडिलांनी रागाच्या भरात भ्रमणभाष तोडणे, आईवर हात उगारणे आदी कौटुंबिक वाद घडत आहेत. यामुळे मुलांमध्ये मानसिक तणाव निर्माण झाला आहे. तणाव आणि संताप नियंत्रणात नसलेली मुले यामुळे हिंसक बनत आहेत. पालकांनी आपल्यातील नातेसंबंध सुरक्षित ठेवून मुलांचे योग्य संगोपन करायला पाहिजे.’’
१५ वर्षांची मुलगी गर्भवती
पणजी : उत्तर गोव्यात १५ वर्षांची मुलगी शाळेतील वैद्यकीय चाचणीच्या वेळी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भवती असलेली मुलगी आणि तिचा अल्पवयीन मित्र जवळच रहातात. दोन्ही मुले उच्चभ्रू (हायप्रोफाईल) कुटुंबातील आहेत. एकाच्या पालकाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे, तर दुसर्याच्या घरातही पालकांमध्ये वाद चालू आहे. ही दोन्ही मुले एकल पालकांकडे रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संपादकीय भूमिकासाधना आणि धर्मशिक्षण यांअभावी अधोगतीला गेलेला समाज ! |