Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !
पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) : ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक नृत्य आणि संगीत महोत्सवाला पर्यटन खात्याने अनुमती दिली आहे. वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीसाठी महोत्सवाचे आयोजन करण्यास अनुमती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने ‘सनबर्न’ आणि तत्सम मोठे महोत्सव यांना अनुमती देण्यासाठी विशेष विभागाची स्थापना केली आहे. या विभागाचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत, तर विभागामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
३१ डिसेंबर या दिवशी ‘सनबर्न’ नाहीच ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
‘सनबर्न’ महोत्सव केवळ २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे आणि ३१ डिसेंबर या दिवशी ‘सनबर्न’ होणार नाही. ‘सनबर्न’विषयी खोटी वृत्ते प्रसारित करणार्यांना वृत्ताचे स्रोत सांगण्याचे आवाहन करणार्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.
(सौजन्य : Prime Media Goa)
काही वृत्तसंस्था आणि सामाजिक माध्यमातील प्रभावशील व्यक्ती स्वत:चा वाचकवर्ग वाढावा म्हणून (‘टी.आर्.पी.’साठी) गोव्यासंबंधी खोटी वृत्ते प्रसारित करत आहे. स्पर्धात्मक पर्यटन युगामध्ये याचा विपरीत परिणाम गोव्याच्या प्रतिमेवर होत आहे. याला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर तज्ञांचा सल्लाही घेतला जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष !
उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वाल्सन ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी गुन्हे अन्वेषण पथक, अमली पदार्थविरोधी पथक आणि स्थानिक पोलीस दक्ष रहाणार आहेत. ‘सनबर्न’ महोत्सवात कुणीही अमली पदार्थाचे सेवन करणार नाही आणि अमली पदार्थासंबंधी एकही प्रकरण नोंद होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा काम करणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
(सौजन्य : Prudent Media Goa)
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ? |