बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्याच्या झुळकीसरशी उडणार्या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल, तर गुरूंच्या वागण्यातील मर्म न समजता त्याचे मन शंका-कुशंकांनी भरून जाते.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘शिष्य’, सुवचन क्र. ३)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
‘शिष्याला आरंभी ‘ज्ञान म्हणजे काय ?’, हे समजले पाहिजे. ‘ज्ञानाचा अर्थ काय ? ते का मिळवायचे ? ते मिळवण्यासाठी कोणत्या गुरूंकडे जायचे ?’, हे सगळे कळावे लागते. तेव्हाच त्याच्यात ज्ञानाची लालसा निर्माण होते.
२ अ. ज्ञानार्जन करण्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या काही शिष्यांची उदाहरणे !
२ अ १. गाणे शिकण्यासाठी लहानपणीच घर सोडणारे आणि अपार कष्ट घेऊन अनेक गुरूंकडून ज्ञानार्जन करून ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे पंडित भीमसेन जोशी ! : अद्वितीय गायक पंडित भीमसेन जोशी यांनी गाणे शिकण्यासाठी वयाच्या अकराव्या वर्षी कुणालाही न सांगता त्यांचे कर्नाटकातील ‘गदग’ हे जन्मस्थान सोडले. आरंभी ते इनायत खां यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर त्यांनी जालंदर येथे पंडित मंगतराम आणि ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. नंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खां यांच्याकडे काही काळ शिकले. त्यांनी काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ आणि रामपूर येथे व्यतीत केली.
पंडित भीमसेन जोशी यांनी कुणालाही न सांगता घर सोडले होते. त्यामुळे त्यांचे वडील त्यांचा शोध घेत होते. काही कालावधीनंतर पंडित भीमसेन जोशी यांची भेट त्यांच्या वडिलांशी झाली. पंडित भीमसेन जोशी यांनी पुन्हा घरी दक्षिणेत येऊन सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांचे शिक्षण चालू केले. त्यांनी सवाई गंधर्व यांची मनोभावे सेवा करून त्यांच्याकडून ज्ञान संपादन केले. त्यांनी गायनात अतुलनीय होण्यासाठी अपार कष्ट केले, तसेच भरपूर रियाज केला. केवळ गायनातच नव्हे, तर स्वत:चे शरीरसुद्धा तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले. त्यांनी ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च बहुमान मिळवला.
२ अ २. गाण्यासाठी लहानपणीच घराचा त्याग करणारे आणि गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून गाणे शिकणारे भावगीतसम्राट श्री. गजानन वाटवे ! : भावगीतसम्राट श्री. गजानन वाटवे हेसुद्धा गाणे शिकण्यासाठी बेळगावहून पळून पुण्याला आले. त्या वेळी त्यांचे वय काही जास्त नव्हते. पुण्याला आल्यावर ते रात्रभर एका देवळाच्या पायरीवर झोपले. तिथे त्यांना ओळखणारा एक भक्त आला आणि पुढे त्यांचे गायनाचे शिक्षण चालू झाले. विनायकराव पटवर्धन यांनी गजाननरावांची सोय गोविंदराव देसाई यांच्या पुण्यातील ‘गोपाल गायन समाज’ या संगीत शिकवणार्या संस्थेत केली. तिथे ते गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून चांगल्या प्रकारे गायन शिकले. गजाननरावांनी अर्थार्जनासाठी शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये गायनाचे वर्ग घेण्यास आरंभ केला. पुढे ते भारतीय सुगम संगीताच्या इतिहासातील एक सुवर्णपान बनले.
२ अ ३. समर्थ रामदासस्वामी यांची खडतर सेवा करून ज्ञानार्जन करणारे कल्याणस्वामी ! : कल्याणस्वामींचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांची प्रकृती कफामुळे बिघडत होती आणि त्यासाठी वैद्यांनी त्यांना जिवंत झरा किंवा जिवंत पाणी असलेली नदी यांतील पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. जिवंत पाण्याची नदी होती उमरोडी नदी. ही सज्जनगडापासून बरीच दूर आणि गडाच्या खाली होती. ही सेवा श्री समर्थ रामदासस्वामींनी कल्याणस्वामींना सांगितली. कल्याणस्वामी दोन मोठे हंडे घेऊन जात असत आणि ते हंडे पाण्याने भरून दोन्ही खांद्यांवर घेऊन गडावर येत असत. समर्थ रामदासस्वामींनी कल्याणस्वामींचे कष्ट बघितले आणि त्यांना कल्याणस्वामींची दया आली. समर्थांनी कल्याणस्वामींसाठी शिधा ठरवून टाकला. समर्थांनी कल्याणस्वामींना प्रतिदिन सकाळी दोन शेर हरभर्याची डाळ, अर्धा शेर गूळ आणि पाव शेर साजूक तूप इतर शिष्यांना देण्यास सांगितले. हा शिधा कल्याणस्वामींना प्रतिदिन मिळू लागला.
ते पाहून इतर शिष्यांच्या पोटात दुखू लागले. ते ‘डाळगप्पू’, असे म्हणून कल्याणस्वामींची निंदा करू लागले. ‘भरमसाठ खायचे आणि गुरासारखे राबायचे. कधी जप करणे नाही, तर कधी दासबोधाचे वाचन नाही. अशा दिनचर्येने त्याचे कधीही सार्थक होणार नाही’, ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली आणि त्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक दिवस त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले आणि विचारले,
‘‘ऐसा सद्गुरु पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी ।
देहेंविण लोटांगणीं । तया प्रभूसी ।।’
ही ओवी दासबोधात नक्की कुठे आहे ?’, ते मला सांगा.’’ दासबोधाची बरीच पारायणे केलेल्या शिष्यांनासुद्धा काही सांगता येईना; पण जेव्हा समर्थ रामदासस्वामींनी कल्याणस्वामींना विचारले, तेव्हा कल्याणस्वामींनी लगेच उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे.’’कल्याणस्वामी चुकले असतील; म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहिला, तर कल्याणस्वामींचे उत्तर योग्य होते. समर्थांनी विचारले, ‘‘कल्याणा, तुझी किती सहस्र पारायणे झाली ?’’ तेव्हा हात जोडून कल्याणस्वामी म्हणाले, ‘‘स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले.’’ त्यावर समर्थ रामदासस्वामींनी विचारले, ‘‘बरं, ते जाऊ दे. अलीकडे ‘डाळगप्पू’ नावाचा कुणी साधक आला आहे का ? हा डाळगप्पू कोण ?’’ तेव्हा कल्याणस्वामी म्हणाले, ‘‘स्वामीजी, जीव-शिव, माया-ब्रह्म, सुख-दुःख, ही दोन दळे जो गप्प करून टाकतो, सदैव अद्वैत बोधात रहातो, तो ‘डाळगप्पू’ होय; मात्र ही व्यक्ती माझ्या पहाण्यात आली नाही.’’
हे सर्व पाहून आणि ऐकून इतर शिष्यांची मान शरमेने खाली गेली.
म्हणून ‘शिष्याच्या मनात ज्ञान संपादन करण्याची इच्छा इतकी दुर्दम्य असली पाहिजे की, गुरु सांगतील, ती सेवा स्वीकारून आणि गुरूंच्या ठिकाणी निस्सीम श्रद्धा ठेवून त्याने ज्ञान संपादन केले पाहिजे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ आ. पूर्वीच्या आणि आताच्या गुरु-शिष्यांतील भेद !
२ आ १. पूर्वीच्या शिष्यांची आपल्या गुरूंवर दृढ श्रद्धा असणे आणि आताच्या शिष्यांची गुरूंवरील श्रद्धा स्वार्थी असणे : गुरूंच्या ठिकाणी असलेली श्रद्धा ही मतलबी अथवा स्वार्थी नसावी. आजकाल अशी पराकोटीची श्रद्धा असणारे शिष्य अत्यल्प आढळतात. आमच्या संगीतक्षेत्रात शिष्य हा एका गुरुवर थोडीशी श्रद्धा, दुसर्या गुरुवर थोडी श्रद्धा, तर तिसर्या गुरुवर आणखी थोडीशी श्रद्धा, अशी श्रद्धेची वाटणी करत अनेक गुरु करतो आणि त्यांच्या नावावर स्वत:ची पोळी भाजून घेतो. ‘या गुरूंचा मी शिष्य आहे; म्हणून माझी मैफील ठेवा’, असेही तो लोकांना आणि संगीतसेवी संस्थांना विनवतो. वर्तमानपत्रातील जाहिरातींमध्येही तो अनेक गुरूंची नावे छापतो आणि त्यांखाली स्वत:चे नाव छापून आपल्या मैफिलीची जाहिरात करतो. पूर्वी असे नव्हते; कारण पूर्वीचे बरेचसे कलाकार हे स्वयंभू कलाकार होते आणि त्यांची एकाच गुरुवर अपरिमित श्रद्धा होती.
२ आ २. पूर्वीचे गुरु आपल्या शिकवणीने शिष्याचे सर्वांगीण व्यक्तीमत्त्व घडवत असणे आणि आताच्या शिक्षकांच्या संदर्भात तसे घडत नसणे : पूर्वी मोठमोठ्या विद्वान व्यासंगी ऋषींची गुरुकुले होती. त्यांमध्ये अनेक शिष्य अनेक विषयांचे शिक्षण घेऊन पारंगत होत असत. त्यांची त्या गुरूंवर पुष्कळ श्रद्धा असे. पूर्वी गुरु आपल्या शिकवणीने शिष्याचे सर्वांगीण व्यक्तीमत्त्व घडवत असत. आज मात्र तसे राहिले नाही. श्रीराम आणि श्रीकृष्ण हेसुद्धा अशाच गुरुकुलांमधून शिकले आणि देवत्वास पावले; परंतु आज अशी गुरुकुले अत्यल्प आहेत. आता शाळा आणि महाविद्यालये निघाली. त्यांत अनेक शिक्षक अनेक मुलांना अनेक विषय शिकवत असतात. ‘श्रद्धा बसावी’, असे हाडाचे शिक्षक आता अत्यल्प आढळून येतात.
‘शिष्याची गुरूंवरील श्रद्धाच त्याला खरे ज्ञान संपादन करण्यास साहाय्य करते. शिष्याचे मन जर गुरूंविषयीच्या शंका-कुशंकांनी भरलेले असेल, तर त्याच्या मनात गुरूंविषयी श्रद्धा निर्माण होत नाही. गुरु मात्र श्रद्धावान शिष्यालाच भरभरून ज्ञान देतात.’
– पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२९.८.२०२३)