संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होणे
ॐ अणुरप्यसतां सङ्गः सद्रुणं हन्ति विस्तृतम् ।
गुणरूपान्तरं याति तक्रयोगाद् तथा पयः ॥
अर्थ : ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.
महारथी कर्ण किती सद्गुणी होता. शौर्य, धैर्य आणि औदार्य या गुणांमध्ये तो अतुलनीय होता. श्रीकृष्ण आणि पांडव यांच्या संगतीत आला असता, तर एक अतिलोकोत्तोर पुरुष झाला असता; पण दुर्योधनाच्या संगतीमुळे त्याची वाटचाल अधःपतनाकडे झाली. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात कर्णाचे वर्तन आणि भाषण अधमाहून अधम माणसाला शोभेल, असे होते. एका गुणसंपन्न माणसाचा अधःपात कशामुळे झाला ? केवळ नीच लोकांच्या संगतीने हा नाश झाला.
दुर्जनामुळे होणारा तोटा : दुष्टाचे फळ सज्जनाला भोगावे लागते !
खलः करोति दुर्वृत्तं नूनं फलति साधुषु ।
दशाननोऽहरत् सीतां बन्धनं स्यान् महोदधेः॥
– हितोपतोदेश, मङ्गलाचरण, श्लोक २२
अर्थ : दुष्ट दुष्टकर्म करतो. त्याचे फळ सज्जनाला भोगावे लागते. रावणाने सीतेचा अपहार केला आणि महासागराला सेतूचे बंधन झाले.