कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्याला अटक करण्याचा दिला आदेश !
|
कोलकाता (बंगाल) – न्यायालयाचा अवमान करण्याचा आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी अधिवक्ता प्रोसेनजीत मुखर्जी यांना अटक करण्याचा आदेश दिला. बार असोसिएशनने यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस्. शिवगणनम् यांच्याकडे मागणी केली की, न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांची सर्व न्यायिक कार्ये परत घेतली जावीत. या वेळी अधिवक्त्यांनी म्हटले की, न्यायमूर्ती गंगोपाध्याय न्यायालयात असतांना आमच्या संघटनेचा कोणताही सदस्य न्यायालयात पाय ठेवणार नाही. त्यांनी अधिवक्ता मुखर्जी यांची क्षमा मागितली पाहिजे.
न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय १८ डिसेंबर या दिवशी ‘पश्चिम बंगाल मदरसा सेवा आयोगा’शी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करत होते. तेव्हा न्यायालयात अधिवक्ता प्रोसेनजीत मुखर्जी उपस्थित होते. त्यांचे आचरण योग्य नसल्याचा आरोप करत न्यायमूर्तींनी त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. अधिवक्ता मुखर्जी यांनी क्षमा मागूनही न्यायमूर्तींनी त्यांचा आदेश मागे घेतला नाही.
त्यानंतर अधिवक्ता मुखर्जी यांनी न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपिठाकडे न्याय देण्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.