अल्पवयीन युवतींच्या अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमा ! – नीलम गोर्हे, उपसभापतींचे निर्देश
विधानपरिषद – प्रश्नोत्तरे
नागपूर – अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन युवतींच्या अत्याचार प्रकरणांत कार्यकर्ते पीडितेच्या घरी भेटायला जातात. त्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आधार दिल्यावर पीडिता जबाब देण्यास सिद्ध होते. प्रत्यक्षात खटला चालू झाल्यावर पीडिता ‘कार्यकर्त्याने सांगितल्यामुळे मी तसा जबाब दिला’, असे सांगते. त्यामुळे सत्याच्या बाजूने काम करणार्या कार्यकर्त्यांना अडचणी येतात. तरी अल्पवयीन युवती अत्याचार आणि ‘पोक्सो’सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा अन् या प्रकरणात पोलिसांनी १ मासात निर्णय घ्यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिले. या संदर्भात ‘तात्काळ कार्यवाही केली जाईल’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उपसभापतींनी हे निर्देश दिले.
नीलम गोर्हे पुढे म्हणाल्या, ‘‘अशा अनेक प्रकरणांमध्ये सरकारी वकील नेमला जात नाही. तोपर्यंत ती पीडित मुलाला जन्म देते, इतकी स्थिती येते. तरी या प्रकरणात जलद अन्वेषण अपेक्षित आहे.’’
या संदर्भातील प्रश्न उपस्थित करतांना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केल्याची घटना जून-जुलै २०१३ मध्ये घडली. या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. यात आटपाडी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपींना पाठीशी घालत असून त्या संदर्भात शासन काय कारवाई करणार आहे ?’’
या संदर्भात उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून ७ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. तपासात काही तांत्रिक अडचणी आहेत. या प्रकरणी जर सदस्यांची पीडितेच्या नातेवाइकांना मारहाण झाल्याची, तसेच तक्रार घेण्यास टाळटाळ केली गेल्याची तक्रार असेल, तर या प्रकरणी अन्वेषण करून योग्य ती कारवाई केली जाईल.’’