साहाय्यक निबंधक यांच्या अन्वेषण अहवालानुसार कारवाई करू ! – दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री
जिजाऊ सहकारी बँक कर्जवाटप प्रकरण
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केले. या प्रकरणी सखोल अन्वेषणासाठी सहकार आयुक्तांनी साहाय्यक निबंधकांची ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून अन्वेषणाची कार्यवाही चालू आहे. अन्वेषणामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. या संदर्भात सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी मंत्री वळसे-पाटील बोलत होते.
मंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘‘सहकार आयुक्तांनी प्रथम अन्वेषणाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालांमध्ये कर्ज संमत प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणे, कर्जदारांची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रकमेची उचल देणे, अल्प व्याजशुल्काने कर्ज संमत करणे, शासनमान्यता न घेता एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवणे इत्यादींमध्ये अनियमितता आढळून आली असल्याचे नमूद केले आहे.’’