राज्यातील ९७ बसस्थानकांचे नूतनीकरण, तर १८६ बसस्थानकांचे ‘बीओटी’ होणार ! – दादाजी भुसे

दादाजी भुसे

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील ९७ बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून एकूण १८६ बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठी ४०२ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

राज्यातील ११ बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या; मात्र त्यांतील केवळ २ निविदांना प्रतिसाद मिळाला. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ प्रस्तावाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. यातील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी सुबोधकुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून येत्या २ मासांत याविषयीचा अहवाल प्राप्त होईल. आतापर्यंत राज्यातील ४५ बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर देण्यात आली असून येत्या काही दिवसांत आणखी ४० बसस्थानकांच्या निविदा काढण्यात येणार येणार आहेत. राज्यातील ७२ स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम चालू असून यांतील ७० स्थानकांची कामे प्रगतीपथावर आहेत. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक योजने’तून स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे चालू आहेत. यामध्ये लोकसहभाग घेण्यात येत आहे.  राज्यातील १९३ बसस्थानकांच्या परिसराचे ‘काँक्रिटिकीकरण’ करण्यात येणार आहे.

बसस्थानकांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयाचे प्रावधान करण्यात आले आहे. येत्या २ मासांत राज्यातील बसस्थानकांचे चित्र पालटण्यात आल्याचे पहायला मिळेल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात दिली.

आमदार प्रकाश आबीटकर, आमदार रत्नाकर गुटे, आमदार सौ. मनीषा चौधरी आदी सर्वांनी बसस्थानकांच्या दुरावस्थेविषयीचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. त्यावर वरील माहिती देण्यात आली.