सनातनच्या भक्तीमार्गी सद़्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी आणि त्यांचा देव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग १’ मध्ये असलेल्या सद़्गुरु आईच्या (सद़्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्या) छायाचित्रात ती भक्तीयोगी असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिले आहे. गेले काही दिवस परात्पर गुरु डॉक्टरांच्या भक्तीयोगाविषयीच्या चौकटी वाचून मला (सुश्री (कु.) राजश्री सखदेव यांना) सद़्गुरु आईच्या साधनायात्रेतील काही प्रसंग आठवले.
‘गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) संदर्भात शिष्याची (सद़्गुरु आईची) भक्ती कशी असते ? भक्तीमुळे गुरु स्वतः किंवा अन्य माध्यमातून शिष्याला कठीण प्रसंगातून कसे सावरून नेतात ? आणि गुरु शिष्याला त्यांच्यासारखे कसे सिद्ध करतात ?’, या संदर्भातील काही ठळक उदाहरणे पुढे दिली आहेत. यातून गुरु (देव) आणि शिष्य (भक्त) यांच्यात असलेल्या नात्याचे काही पैलू उलगडायला साहाय्य होईल.
शिष्याला स्वयंपूर्ण करून त्याला स्वतःप्रमाणे घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद़्गुरु आईला ‘त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय कसे शोधायचे ?’, याविषयी सविस्तर माहिती लिहिलेली कागदी प्रत दिली. त्यांनी सद़्गुरु आईला सांगितले, ‘‘ही माहिती वाचून तुम्ही साधकांना नामजप शोधून सांगा.’’ त्यापूर्वी सद़्गुरु आईंनी कधीही नामजपादी उपाय शोधणे किंवा त्या संदर्भातील काही केले नव्हते. सद़्गुरु आईने एकदाच ती प्रत वाचली आणि नंतर ती सहजतेने साधकांना नामजपादी उपाय शोधून सांगू लागली. केवळ अन्य साधकांना नामजप शोधून देणे इतक्यापुरते ते मर्यादित न रहाता स्वतःला श्वास घ्यायला त्रास होत असतांना सद़्गुरु आई स्वतःसाठीही नामजप शोधू लागली. शिष्याला स्वयंपूर्ण करून स्वतःप्रमाणे घडवणारे प.पू. डॉक्टर खरोखर महान आहेत !’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव,(१०.१२.२०२३)
‘देव सद़्गुरु आईच्या समवेत आहे’, असे दर्शवणारे काही प्रसंग
१. एकदा सद़्गुरु आईच्या खोलीत वापरायच्या सपाता (चपला) चंदेरी रंगाच्या दैवी कणांनी पूर्ण भरून गेल्या होत्या.
२. त्यांच्या खोलीत सतत दैवी नाद ऐकू येत असे.
३. त्यांना खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत असे.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव
१. कर्मयोगी आणि अव्यक्त भाव असलेली सद़्गुरु आई !
अध्यात्ममार्गातील व्यक्ती सहसा बराच वेळ देवपूजा करतेे, व्रत-वैकल्ये करतेे, देवळात जाते, पोथ्या वाचते, प्रवचनांना जाते, देवाविषयी बोलते आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, अभ्यास करतांना दिसते. ‘जवळपास कुणी संत आले आहेत’, असे समजल्यास बहुतेक जण त्यांच्या दर्शनाला जातांना दिसतात आणि स्वतः जे अनुभवले, ते इतरांना सांगतांना दिसतात.
या पार्श्वभूमीवर मी लहानपणापासून आईला यातील काहीच करतांना पाहिले नाही. ‘त्या त्या वेळी कामे नेटकेपणाने करणे, कधीच कोणत्याच गोष्टीत कंटाळा न करणे, एखादी गोष्ट करायची असतांना कितीही अडचणी आल्या, तरीही सोडून न देता ती गोष्ट पूर्ण करणे’, असे मला सद़्गुरु आईच्या संदर्भात आठवते. बहुतेक वेळा वडील (कै. शशिकांत सखदेव) घरातील देवपूजा करत असत. आई स्नानानंतर देवाला हळद-कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करत असे. बस ! या व्यतिरिक्त वर उल्लेख केलेल्या कोणत्याच गोष्टी करतांना मी सद़्गुरु आईला पाहिले नाही. आमच्या घरी जुईच्या फुलांची वेल होती. तिला पावसाळ्यात पुष्कळ फुले येत असत. एके वर्षी मी आग्रह केल्याने सद़्गुरु आईने देवाला जुईच्या फुलांचा लक्ष (एक लक्ष फुले) वाहिला. त्यासाठी रात्री फुले मोजून ठेवणे इत्यादी गोष्टी तिने मनोभावे केल्या; पण याविषयी ती स्वतःहून इतरांशी बोलली नाही की, ‘मी असे असे करत आहे.’ ती प्रतिदिन स्नानानंतर श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असे. अशा वेळी कुणी मधेच काही बोलले, तरीही ज्या श्लोकापर्यंत म्हणून झाले असेल, तेथून पुढे ती श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असे. त्या वेळी ‘तिला असे नेमके कसे आठवते ?’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटत असे.
२. सद़्गुरु आईने तिच्या वडिलांनी सांगितल्यानुसार श्रीरामाचा नामजप करणे
वर्ष १९८० मध्ये सद़्गुरु आईला क्षयरोग झाल्याने तिला ६ मास पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. त्या वेळी तिच्या वडिलांनी (म्हणजे माझ्या आजोबांनी) तिला ‘पडल्या पडल्या श्रीरामाचा नामजप कर’, असे सांगितले. तेव्हा तिने नामजप चालू केला. त्यानंतर ती अखंड नामजप करू लागली.
३. सद़्गुरु आईने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर आरंभापासूनच तिला येत असलेल्या भावानुभूती
३ अ. सद़्गुरु आईला सदासर्वकाळ सगळीकडे परात्पर गुरु डॉक्टर दिसणे आणि त्यांनी सद़्गुरु आईचे जीवन व्यापलेले असणे : वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर सद़्गुरु आईचा रामनामाचा जप आपोआप बंद होऊन कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप चालू झाला. तिच्या जीवनात परात्पर गुरु डॉक्टर आले आणि त्यांनी तिचे जीवन व्यापले. सद़्गुरु आईला सदासर्वकाळ सगळीकडे परात्पर गुरु डॉक्टरच दिसत. ती स्वयंपाक करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर जेवणाच्या पटलावर बसलेे आहेत आणि ती त्यांना जेवण बनवून वाढत आहे. दुपारच्या वेळेत परात्पर गुरु डॉक्टर बैठककक्षातील त्यांच्या ठरलेल्या आसंदीत बसले आहेत’, असे ती प्रतिदिन अनुभवत होती. याविषयी तिने कधीच स्वतःहून सांगितले नाही. तिला विचारल्यावर ती सांगत असे. ‘याविषयी सांगतांनाही ती हर्षभरित झाली आहे’, असेही दिसत नसे; मात्र ‘तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा आहे’, हे स्पष्टपणे कळत असे. ‘तिचा भाव जागृत झाला आहे’, असे मी क्वचित्च पाहिले; मात्र ती कोणत्याही प्रसंगी आनंदी असे.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या वेळी सद़्गुरु आईला खोलीत खाली बसण्यासाठी जागा नसतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सद़्गुरु आईला त्यांच्या शेजारी असलेल्या सुखासनावर बसण्यास सांगणे आणि सद़्गुरु आईला त्यांच्या चरणांपाशी बसण्याची संधी मिळणे : वर्ष १९९८ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉक्टर सांगली जिल्ह्यातील सेवा करणार्या साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्या वेळी सद़्गुरु आईलाही त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बोलावले होते. ती मार्गदर्शनाच्या ठिकाणी पोचेपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांचे आगमन झाले होते आणि श्री. प्रमोद घोले यांच्या घरातील त्या मोठ्या खोलीत साधक सर्वत्र बसले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सद़्गुरु आईला पुढे बोलावले आणि त्यांच्या शेजारी असलेल्या सुखासनावर बसायला सांगितले. तेव्हा सद़्गुरु आई सुखासनावर न बसता त्यांच्या चरणांपाशी लहानशा जागेत बसली.
३ इ. सद़्गुरु आईला झोपायच्या खोलीत रात्रीच्या अंधारात एक ज्योत दिसणे : आमच्या झोपायच्या खोलीत २ लाकडी कपाटे होती. वर्ष १९९९ मध्ये त्या कपाटांच्या मधल्या जागेत सद़्गुरु आईला नेहमी एक ज्योत दिसत असे. तिने ५ – ६ वेळा मला ‘ती ज्योत दिसते का ?’, हे पहायला सांगितले; पण मला ती ज्योत दिसत नसे. सद़्गुरु आई सांगत असे, ‘‘मला ती ज्योत स्पष्ट दिसते आणि अगदी पहाट होईपर्यंत ज्योत तेथे असते.’’
३ ई. सद़्गुरु आईचे पाय दुखत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून पायांवरून हात फिरवले’, असे तिला जाणवणे
३ ई १. सकाळी सद़्गुरु आईचे पाय दुखणे न्यून होणे आणि तिला अशी अनुभूती अनेक वेळा येणे : अनुमाने वर्ष २००८ मध्ये १५ दिवस सद़्गुरु आई रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आली होती. त्या कालावधीत तिचे पाय पुष्कळ दुखत असत. एकदा रात्री ती झोपली असतांना तिला स्पष्टपणेे जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टर तिच्या पायांवरून हात फिरवत आहेत.’ तिला हाताचा मऊ आणि ऊबदार स्पर्श जाणवला. दुसर्या दिवशी तिचे पाय दुखणे न्यून झाले.
३ ई २. परात्पर गुरु डॉक्टरांनी सद़्गुरु आईचे केलेले कौतुक : याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी जनाबाईला दळण दळायला विठ्ठल साहाय्य करत असे. तसे आताच्या काळातही होत आहे. याचे हे उदाहरण आहे. यासाठी भक्ती करायला हवी.’’ अशी अनुभूती सद़्गुरु आईला घरी असतांना आणि नंतर ती रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना अनेक वेळा आली आहे.
३ उ. सद़्गुरु आईला सायंकाळी त्रास होत असणे, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी ‘उद्यापासून त्रास होणार नाहीत’, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे : वर्ष २०१० मध्ये सद़्गुरु आईला एक त्वचाविकार झाल्याचे निमित्त झाले आणि आधुनिक वैद्यांची औषधे घेणे, रुग्णालयात भरती होणे, अशी शृंखला चालू झाली. त्या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ वाजल्यानंतर तिला मळमळत असे. तिला कलकल्यासारखे होऊन ती अस्वस्थ होत असे. आधुनिक वैद्यांनी उपचार करूनही तिला होत असलेला त्रास न्यून झाला नाही. अनुमाने ४ दिवस असे झाल्यानंतर एकदा सायंकाळी तिला बरे वाटत नसतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांना दूरभाष करून सद़्गुरु आईच्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सहजतेने सांगितले, ‘‘उद्यापासून असे त्रास होणार नाहीत.’’ खरेच दुसर्या दिवसापासून चमत्कार झाल्याप्रमाणे आईला होणारे त्रास बंद झाले. ‘गुरु शिष्याची काळजी कशी घेतात !’, हे यातून लक्षात आले.
३ ऊ. सद़्गुरु आईला तासगाव येथील गणपतीच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत चालत जाता येणे आणि ‘गणपतीचे दर्शन घेतल्याने शक्ती मिळाली’, असे सद़्गुरु आईने सांगणे : अनुमाने २ मास सद़्गुरु आईला घरात चालायलाही कठीण होत होते. त्यानंतर सद़्गुरु आईला थोडे बरे वाटू लागल्यावर आम्ही ‘तिला चारचाकी गाडीतून थोडा वेळ बाहेर घेऊन जावे’, या उद्देशाने सांगलीपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या तासगाव येथील गणपतीच्या दर्शनाला जायचे ठरवले. हा गणपति जागृत आहे. ‘सद़्गुरु आईला चारचाकी गाडीत बसूनही मुख्य प्रवेशद्वारातून गणपतीचे व्यवस्थित दर्शन होईल’, या हेतूने आम्ही तासगाव येथील गणपतीच्या दर्शनाला गेलो. तेथे गेल्यावर आईने मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरात आतपर्यंत चालत जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. ‘‘गणपतीच्या दर्शनाने मला शक्ती मिळाली’’, असे तिने सांगितले. किती ही देवाची कृपा !
३ ए. सद़्गुरु आईने प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ‘ती तेजाने न्हाऊन निघाली आणि तिला प.पू. गोंदवलेकर महाराज यांनी चैतन्य प्रदान केले’, असे जाणवणे : त्यानंतर आम्ही सद़्गुरु आईला विचारले, ‘‘पुढे ८२ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र गोंदवले येथे जायला जमेल का ?’’ तिने होकार दिल्याने आम्ही गोंदवले येथे गेलो. तेथील पुजार्यांनी प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वयस्कर व्यक्तींसाठी असलेल्या दारातून आत जायला सांगितले. सद़्गुरु आई आणि माझा भाऊ (श्री. गुरुदत्त सखदेव) त्या दारातून आत गाभार्यात गेले. नंतर गाभार्यातील वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत होेईपर्यंत उभे रहायला लागू नये; म्हणून पुजार्यांनी तेथेच सद़्गुरु आईला बसण्यासाठी स्टूल दिले. अनुमानेे ५ मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या कालावधीत पुजार्यांनी अन्य कोणालाच दर्शनासाठी गाभार्यात सोडले नाही. गाभार्यात सद़्गुरु आई, माझा भाऊ आणि पुजारी एवढेच होते. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर आई दर्शन घेऊन बाहेर आली. तेव्हा ‘ती तेजाने न्हाऊन निघाली आहे’, असे मला दिसले. प.पू. गोंदवलेकर महाराज यांनीच सद़्गुरु आईला चैतन्य प्रदान केले.
३ ऐ. सद़्गुरु आईची साधना आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची कृपा यांमुळे सद़्गुरु आईच्या खोलीतील वायूतत्त्वाचे प्रमाण वाढून प्राणवायूचा लोखंडी जड सिलिंडर आपोआप हलणे : वर्ष २०१४ मध्ये सद़्गुरु आईला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला प्राणवायू द्यावा लागत असे. सद़्गुरु आईची साधना आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची कृपा यांमुळे खोलीतील वायूतत्त्व वाढल्याने प्राणवायूचा लोखंडी जड सिलिंडर हलत असे. हे कळल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आजी हेवी वेट चॅम्पियन झाल्या !’’ असे घडणे ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच कृपा !
३ ओ. गोड पदार्थ विशेष आवडत नसतांना परात्पर गुरु डॉक्टर पाठवत असलेला गोड प्रसाद प्रतिदिन ग्रहण करणे आणि नंतर गोड पदार्थ आवडू लागणे : सद़्गुरु आईला गोड पदार्थ विशेष आवडत नसत. वर्ष २०१५ मध्ये एकदा तिला आध्यात्मिक त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी काही दिवस (२ – ३ मास) त्यांच्या जेवणातील पदार्थ सद़्गुरु आईला प्रतिदिन द्यायला सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रसाद म्हणून सद़्गुरु आई प्रतिदिन गोड पदार्थ खाऊ लागली आणि नंतर तिला गोड पदार्थ आवडू लागले. स्वतःप्रमाणे शिष्याला घडवणारे प.पू. डॉक्टर ! प.पू. डॉक्टरांनी सद़्गुरु आईची आवडनावड पालटून टाकली.
३ औ. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन म्हणून शारीरिक स्थिती नाजूक असतांनाही सद़्गुरु आईने प्रतिदिन थोडा आंबा खाणे : वर्ष २०१६ मध्ये आंब्याच्या दिवसांत परात्पर गुरु डॉक्टरांनी सद़्गुरु आईला प्रतिदिन एक आंबा द्यायला सांगितला. त्या वेळी सद़्गुरु आईची शारीरिक स्थिती नाजूक असूनही तिने परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन म्हणून प्रतिदिन थोडातरी आंबा खाल्ला.
३ अं. ‘सद़्गुरु आईच्या हातातच दैवी कणांची निर्मिती होते’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : वर्ष २०१२ पासून सद़्गुरु आईच्या खोलीतील केर काढल्यानंतर त्यात अगणित दैवी कण आढळत. त्या केरातील अन्य कचरा बाजूला करून खालच्या धुळीत पाहिल्यास त्यात पुष्कळ संख्येने दैवी कण आढळत. सद़्गुरु आई ती धूळ सुपलीत घेऊन त्यातून सुईने दैवी कण तळहातावर घेऊन त्यांना चिकटलेली धूळ किंवा कचरा बाजूला करून केवळ दैवी कण एका ‘प्लास्टिक’च्या डबीत ठेवत असे. असे करत असतांना तिच्या हातावरील दैवी कण संपत नसत. त्यामुळे तिला वाटत असे, ‘हे दैवी कण इतक्या संख्येने हातात कुठून येतात ?’ तिने मला हा प्रश्न परात्पर गुरु डॉक्टरांना विचारायला सांगितला. ते ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘सद़्गुरु आजींच्या हातातच दैवी कणांची निर्मिती होत आहे.’’
३ क. हवेतून सद़्गुरु आईच्या हातावर कुंकू पडत असणे, ‘सद़्गुरु आजी समष्टीसाठी नामजप करत असल्याने देव कुंकवाच्या माध्यमातून त्यांना शक्ती प्रदान करत आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : वर्ष २०१२ मध्ये एकदा सायंकाळी चेहर्याला लावण्यासाठी मी सद़्गुरु आईच्या हातावर पावडर घालत होते. तेव्हा हवेतून सद़्गुरु आईच्या हातावर कुंकू पडत असतांना मला स्पष्टपणे दिसले. ते कुंकू दैवी असल्याचे श्रीचितशक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले. त्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांना सांगतांना मी त्यांना सांगितले, ‘या प्रसंगापूर्वी अनेक वेळा सद़्गुरु आईच्या पलंगावरील चादरीवर लाल रंगाचे डाग पडले.’’ मी त्यांना त्या डागांची छायाचित्रेही दाखवली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘सद़्गुरु आजी समष्टीसाठी नामजप करतात; म्हणून त्यांच्यावर सतत अनिष्ट शक्तींची तीव्र आक्रमणे होतात. कुंकवाच्या माध्यमातून देवच त्यांचे रक्षण करत आहे. कुंकवातून त्यांना शक्ती मिळत आहे.’’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव (सद़्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |