देशातील १० लाख, तर महाराष्ट्रातील ७० सहस्र मंदिरांत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार !
अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा !
मुंबई – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त देशातील १० लाख, तर राज्यातील ७० सहस्र मंदिरांत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी मंदिरांत मोठे पडदे (स्क्रीन) लावले जातील. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांतातील (मराठवाडा, खान्देश) २० सहस्र मंदिरांचा समावेश आहे. तसेच मंदिरांत दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत, असे विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे यांनी सांगितले. ‘विहिंपच्या मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम’च्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. सर्व मंदिरांशी संपर्क साधून माहिती दिली जात आहे. देशभरात विहिंपच्या वतीने बैठका घेण्यात येत आहेत. मंदिरांत ३ घंटे रामनामाचा जप, आरती, प्रसाद वाटप कार्यक्रमही होईल.
१. विहिंपच्या ‘मंदिर अर्चक पुरोहित आयाम’चे संभाजीनगर शहरप्रमुख राजीव जहागीरदार यांनी सांगितले की, या निमित्ताने मंदिरावर रोषणाई करावी, प्रत्येकाने त्यांच्या घरी किमान ५ दिवे लावावेत.
२. छत्रपती संभाजीनगरच्या २ सहस्र मंदिरांत ‘स्क्रीन’द्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. सर्व मंदिरांच्या विश्वस्तांना भेटून नियोजनाची माहिती विहिंपचे पदाधिकारी कळवत आहेत.
३. देशातील ४ सहस्र, तर देवगिरी प्रांतातील ७० संत अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी संतांना निमंत्रण दिले आहे. यात रामकृष्ण मंदिराचे विष्णुपादानंद महाराज, मठाचे बालगिरी महाराज, अमळनेरचे प्रसाद महाराज, अच्युत महाराज दस्तपूरकर, शांतीगिरी महाराज यांचा समावेश आहे. सर्व संत स्वखर्चाने अयोध्येला जातील. राज्यात पवित्र अक्षतांचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे.