संपादकीय : महाराष्ट्राचा पंजाब होणार ?
महाराष्ट्र सरकार अमली पदार्थ माफियांना पाठीशी घालत आहे, असा आरोप करत विरोधकांनी विधानभवनात आंदोलन केले. या आंदोलनामागे राजकीय हेतू काहीही असो, सद्यःस्थिती पहाता ‘पंजाब पाठोपाठ महाराष्ट्र अमली पदार्थांचे माहेरघर बनले आहे’, हेच वेगवेगळ्या घटनांवरून दिसून येते. काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये १०६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले. ‘इलेक्ट्रिक पोल’ बनवण्याच्या नावाखाली ‘एम्डी’ नावाचा अमली पदार्थ या ठिकाणी बनवला जात होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कारवाई करण्यात आली. पूर्वी महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी होेत होती. आता रायगडसारख्या जिल्ह्यात अमली पदार्थांची निर्मितीही होते, हे भयावह आहे. जेथे उत्पादन होते, तेथे त्यांचे विक्रेतेही असतील आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ग्राहकही असतील. हा ग्राहकवर्ग तरुण आहे. पूर्वी शाळा आणि महाविद्यालये यांच्या जवळ असलेल्या टपर्यांवर गोळ्या, चॉकलेट, चणे-फुटाणे किंवा वडापाव असे मिळत होते. आता त्याची जागा अमली पदार्थांनी घेतली आहे. केवळ रायगडच नव्हे, यापूर्वी सोलापूर आणि नाशिक येथेही अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यातून महाराष्ट्रात अमली पदार्थ बनवणार्या माफियांची साखळी निर्माण झाली असून ते बनवण्याचे जे अड्डे उद़्ध्वस्त होत आहेत, त्यापेक्षा प्रतिदिन हे अड्डे निर्माण होण्याची आकडेवारी मोठी आहे. बरं, हे सुरक्षायंत्रणांना ठाऊक नाही का ? अमली पदार्थ माफिया ललित पाटील याच्या अटकेनंतर ज्या गतीने अमली पदार्थांच्या तस्करांवर किंवा त्याची विक्री करणार्यांवर कारवाई होणे आवश्यक होते, तेवढी गतीमानता यंत्रणांनी दाखवलेली नाही. हे जाळे पूर्णपणे उद़्ध्वस्त करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव आहे, हेही तितकेच खरे !
वर्ष २०१९ च्या सर्वेक्षणानुसार भारतात अमली पदार्थांच्या सेवनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमधून भारतात अमली पदार्थांची तस्करी होते. तस्कर भारतात अमली पदार्थ पोचवण्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या राबवत आहेत. आता तर सीमेपलीकडून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी रोखणे, ही भारतीय यंत्रणांसमोरील मोठी समस्या आहे. याचा फटका पंजाबला बसला आहे. भारतात पंजाब हे ‘अमली पदार्थ विक्रेते आणि सेवन करणारे’ यांचा अड्डा बनले आहे. पंजाबमध्ये ३५ टक्के घरांमधील एक तरी व्यक्ती ही अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा तेथील सरकारसमोरील गंभीर प्रश्न आहे. भविष्यात अशीच स्थिती महाराष्ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !