स्‍वत:तील दोषरूपी अफझलखानाला नष्‍ट करूया !

आज ‘शिवप्रतापदिन’ (अफझलखान वध दिन) आहे. त्‍या निमित्ताने…

सुसंस्‍कृत नागरिकांच्‍या निर्मितीसाठी कुसंस्‍काररूपी अफझलखान नष्‍ट केल्‍याविना समाज आणि राष्‍ट्र यांचा उध्‍दार होणे अशक्‍य !

१. व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना यांच्‍या बळावर छत्रपती शिवरायांकडून अफझलखानाचा वध !

श्री. दुर्गेश परुळकर

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन करण्‍याची शपथ घेतली. ते त्‍यांच्‍या जीवनाचे ध्‍येय होते. त्‍यांच्‍या या महान ध्‍येयाच्‍या आड येणार्‍या प्रत्‍येक गोष्‍टी त्‍यांनी दूर केल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतःचे सामर्थ्‍य वाढवले आणि स्‍वतःला शिस्‍त लावली. प्रामाणिकता, राष्‍ट्र्रनिष्‍ठा, संस्‍कृतीनिष्‍ठा, धर्मनिष्‍ठा, प्रतिकारक्षमता, न्‍यायनिष्‍ठा आणि नैतिकता अंगी बाणवून स्‍वतःचे जीवन घडवले. त्‍यानंतर त्‍यांनी आपल्‍या राष्‍ट्रीय कार्याच्‍या आड येणार्‍या सर्व विघ्‍नांना नष्‍ट केले. या सर्व गोष्‍टी त्‍यांनी त्‍यांच्‍या समवेत येणार्‍या सर्व मावळ्‍यांमध्‍ये निर्माण केल्‍या. वैयक्‍तिक आणि कौटुंबिक जीवनाहून राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य देण्‍याची दृष्‍टी त्‍यांच्‍या सहकार्‍यांमध्‍ये निर्माण व्‍हावी, असे संस्‍कार केले. या बळावरच त्‍यांनी औरंगजेबासारख्‍या महाबलाढ्य सम्राटाला शह दिला आणि अफझलखानासारख्‍या स्‍वराज्‍यावर चालून आलेल्‍या बलाढ्य शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अशा छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्‍या समोर ठेवून आपल्‍यालाही आपल्‍या राष्‍ट्राच्‍या रक्षणार्थ स्‍वतःची जडणघडण करणे नितांत आवश्‍यक आहे.

२. देशाचा निष्‍ठावंत नागरिक म्‍हणून कोणती कर्तव्‍ये पाळावीत ?

देशाचा निष्‍ठावंत नागरिक म्‍हणून काही कर्तव्‍ये आपल्‍याला बजावता आली पाहिजेत. त्‍यासाठी छत्रपती शिवरायांप्रमाणे आपल्‍यात सद़्‍गुण वाढवावे लागणार आहेत, म्‍हणजेच आपल्‍यातील दोषरूपी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. त्‍याला नष्‍ट केले, तरच आपल्‍याला आपल्‍या राष्‍ट्र्राची प्रगती साध्‍य करता येईल.

२ अ. स्‍वयंशिस्‍त : प्रथम आपल्‍याला अनुशासित समाज निर्माण करावा लागेल. देशातील सर्व नियम आपण काटेकोरपणे पाळले पाहिजेत. उदाहरणार्थ रहदारीच्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. राष्‍ट्र्रहिताला बाधक ठरणारी कोणतीही कृती आपल्‍या हातून घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राष्‍ट्रीय संपत्तीची हानी करणार्‍या व्‍यक्‍ती किंवा समूह यांना प्रतिबंध करण्‍याचे सामर्थ्‍य आपल्‍याला संपादन करावे लागेल.

२ आ. भ्रष्‍टाचाराच्‍या विरुद्ध लढा : ‘भ्रष्‍टाचार’ या शब्‍दाचा अर्थ अत्‍यंत व्‍यापक आहे. केवळ लाच खाणे, याला भ्रष्‍टाचार म्‍हणत नाहीत. आचार याचा अर्थ ‘वर्तन’ असा आहे. ‘भ्रष्‍ट वर्तन, म्‍हणजे भ्रष्‍टाचार’, असा या शब्‍दाचा व्‍यापक अर्थ आहे. आपली कोणतीही कृती आपला समाज, तसेच कायदा-सुव्‍यवस्‍थेला बाधा निर्माण करणार नाही, अशी असली पाहिजे. तसेच देशातील शांतता आणि सुव्‍यवस्‍था नष्‍ट करणार्‍या व्‍यक्‍तींविरुद्ध सनदशीर मार्गाने संघर्ष करण्‍याची आपली सिद्धता असली पाहिजे.

२ इ. संघटन : थोडक्‍यात आपल्‍याला आपल्‍या राष्‍ट्राच्‍या रक्षणार्थ सजग आणि कृतीशील रहावे लागणार आहे. त्‍यासाठी आपल्‍यामध्‍ये प्रतिकारनिष्‍ठा जागवावी लागेल. ‘प्रत्‍येक नागरिक प्रतिकारनिष्‍ठ झाला, म्‍हणजे समस्‍या सुटली’, असे होणार नाही. देशातील सर्व सुजाण नागरिकांनी संघटित होणे नितांत आवश्‍यक आहे. ही संघशक्‍ती राष्‍ट्राच्‍या रक्षणार्थ अत्‍यंत महत्त्वाची आहे.

२ ई. नागरिकांना राष्‍ट्रशिक्षण : देशातील प्रत्‍येक नागरिक हा सुसंस्‍कृत आणि सुविद्य असलाच पाहिजे, यासाठी आपल्‍यालाच खटपट करावी लागणार आहे. आपला समाज हा राष्‍ट्रीय शिक्षणापासून वंचित राहिला आहे. ते राष्‍ट्रीय शिक्षण देऊन त्‍याला सक्रीय करण्‍याचे दायित्‍व आपल्‍यावर आहे. थोडक्‍यात आपल्‍याला केवळ आपल्‍या अधिकारांची जाणीव आहे. आपण आपल्‍या राष्‍ट्रीय  कर्तव्‍यापासून लांब राहिलो आहोत, हा आपल्‍यातील सर्वांत मोठा दोष आहे. हा दोष नष्‍ट करण्‍यासाठी आपण राष्‍ट्रीय कर्तव्‍याला प्राधान्‍य दिले पाहिजे. आपली ही राष्‍ट्र्रनिष्‍ठा आपले राष्‍ट्र सुदृढ आणि बलाढ्य होण्‍यास कारणीभूत ठरणार आहे.

२ उ. खर्‍या इतिहासाचे अध्‍ययन : यासाठी प्रथम आपल्‍याला स्‍वतःचे अज्ञान दूर केले पाहिजे. अज्ञानरूपी अफझलखानाचे जोपर्यंत आपण हनन करत नाही, तोपर्यंत आपल्‍याला आपल्‍या राष्‍ट्राचे संरक्षण करता येणार नाही. त्‍या संरक्षणासाठी लागणारी प्रतिकारनिष्‍ठाही संपादन करता येणार नाही. आपल्‍यालाच आपल्‍या देशाच्‍या थोर परंपरेचा खरा इतिहास ज्ञात नाही. तो  जाणून घेण्‍यासाठी आपण सक्रीय होणे नितांत आवश्‍यक आहे.

३. आठवड्यातील किमान एक दिवस राष्‍ट्र्रासाठी द्या !

आपण ‘खा, प्‍या आणि मजा करा’, असे जीवन जगत असलो, तरी ‘आपण एखाद्या पशूसारखे जीवन जगत आहोत’, हे आपल्‍या लक्षात येत नाही. ‘माणसाच्‍या जीवनात थोडीफार करमणूक नितांत आवश्‍यक असली, तरी राष्‍ट्रीय कर्तव्‍य दूर सारून करमणुकीत वेळ वाया घालवणे, हा राष्‍ट्रीय अपराध ठरतो’, याची जाणीव आपण आपल्‍या मनाला करून दिली पाहिजे. त्‍यासाठी आपण आपल्‍या वैयक्‍तिक जीवनात शिस्‍त पाळणे नितांत आवश्‍यक आहे. आपल्‍याला मिळणारा फावला वेळ आपला इतिहास, आपली ऐतिहासिक परंपरा आणि आपली संस्‍कृती जाणून घेण्‍यासाठी कारणी लावला पाहिजे. किमान आठवड्यातील एक दिवस आपण आपल्‍या राष्‍ट्र्रासाठी देणे, हे आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजले पाहिजे, तरच राष्‍ट्राची खरी उभारणी आपल्‍या हातून होईल. देशातील प्रत्‍येक नागरिक राष्‍ट्रभक्‍त आणि कृतीशील झाला, तर समाजकंटक अन् राष्‍ट्रद्रोही यांना वेसण घालणे सहज शक्‍य होईल.

४. सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांनी राष्‍ट्रभक्‍ती अंगी बाणवणे आवश्‍यक !

सर्वसामान्‍य नागरिकांनी ज्‍याप्रमाणे त्‍यांचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य बजावणे नितांत आवश्‍यक आहे, तसेच सर्व सरकारी अधिकार्‍यांनीही प्रामाणिकपणे राष्‍ट्र्रहिताचा विचार करून त्‍यांना देण्‍यात आलेल्‍या अधिकारांचा उपयोग प्रामाणिकपणे केला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी स्‍वराज्‍याच्‍या चाकरीत असलेल्‍या सर्वांसाठी जी नियमावली सिद्ध केली, तिचे आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशा प्रकारची जाणीव सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, तसेच अधिकारी यांनी स्‍वतःत निर्माण करणे नितांत आवश्‍यक आहे. लबाडी, लाचखोरी, अप्रामाणिकता, कामचोरपणा, अशा राष्‍ट्राला हानीकारक ठरणार्‍या अनेक अफझलखानांना आपण गाडले पाहिजे. ‘हा देश, हे राष्‍ट्र, हा समाज माझा आहे आणि मी या राष्‍ट्राचा आहे’, ही भावना प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात २४ घंटे जागी असली पाहिजे.

५. शिक्षकांनी स्‍वतःतील दोष दूर करून ज्ञान आणि विद्यार्थी परायण होणे आवश्‍यक !

शिक्षकांनीही अशा प्रकारचा विचार करून प्रत्‍येक विद्यार्थी हा आपल्‍या देशाचा भावी नागरिक असून त्‍याला राष्‍ट्रीय कर्तव्‍य प्रामाणिकपणे करावे लागणार आहे. त्‍यासाठी ‘विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासाचे दायित्‍व आपल्‍यावर आहे’, याची जाणीव ठेवून ते दायित्‍व प्रामाणिकपणे सांभाळणे, हेच स्‍वतःचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य मानले पाहिजे. शिक्षकांनीही स्‍वतःतील दोष दूर करून ज्ञान आणि विद्यार्थी परायण होणे आवश्‍यक आहे. असे झाले, तरच विद्यार्थीही ज्ञान आणि शिक्षक परायण होतील. सुसंस्‍कारांची ओढ आणि कुसंस्‍कारांची घृणा निर्माण करण्‍याचे दायित्‍व केवळ शिक्षकांचे नाही, तर प्रत्‍येक सुजाण नागरिकाचे आहे.

स्‍वयंशासित समाज निर्माण करण्‍याचे ध्‍येय आपण आपल्‍यासमोर ठेवले पाहिजे. आपल्‍या वेदांची उद़्‍घोषणा हीच आहे. सुविद्य, सुसंस्‍कृत आणि सुजाण नागरिकांच्‍या निर्मितीवाचून समाज आणि राष्‍ट्र बलाढ्य होत नाही. कुसंस्‍कारांपासून सर्वांची सुटका व्‍हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. कुसंस्‍काररूपी अफझलखान नष्‍ट केल्‍यावाचून समाज आणि राष्‍ट्र यांचा उद़्‍धार होणे शक्‍य नाही.

६. राष्‍ट्रीय जीवनाच्‍या मोहात पडणे, हाच खरा मानसिक आणि बौद्धिक विकास !

‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’, हे सुखी, समृद्ध आणि बलाढ्य राष्‍ट्राचे अन् समाजाचे मूलभूत सूत्र आहे. हे सूत्रच राष्‍ट्र आणि समाज यांची संजीवनी आहे, याची जाणीव सर्वांनाच करून देणे, हे आपले कर्तव्‍य आहे. आपण आपल्‍या इतिहासात घडलेल्‍या चुका सुधारल्‍या नाहीत, तर तो चुकांचा अफझलखान पुनश्‍च आपल्‍या मानगुटीवर बसल्‍यावाचून रहाणार नाही. हे जाणून गतकाळातील चुका जाणीवपूर्वक टाळणे अतीमहत्त्वाचे आहे. वैयक्‍तिक मोहाहून तो मोह वाढवून त्‍याचा अधिक विस्‍तार करून त्‍याची व्‍यापकता वाढवून राष्‍ट्रीय जीवनाच्‍या मोहात पडणे, हाच आपला खरा मानसिक आणि बौद्धिक विकास आहे. माझ्‍या देशातील सर्वांच्‍याच प्रगतीचा प्रगल्‍भ विचार हाच राष्‍ट्रीय जीवनाचा पाया ठरणार आहे. याचाच अर्थ संकुचित आणि स्‍वार्थी विचार यांना अफझलखान समजून आपण त्‍यांचाही अंत घडवून आणला पाहिजे.

७. भारताला विश्‍वगुरु करण्‍यासाठी स्‍वत:तील दोषरूपी अफझलखानाला ठार करूया !

अशा प्रकारे सामर्थ्‍य, बलाढ्य आणि मानवी मूल्‍ये यांची जोपासना करणारा ऋषिमुनींच्‍या कल्‍पनेतील ‘हे विश्‍वची माझे घर’, अशी भावना तन अन् मन यांत निर्माण झालेला संपूर्ण मानवी समाज या भूतलावर निर्माण करण्‍याचे ध्‍येय आपल्‍याला गाठायचे आहे. हे ध्‍येय जेव्‍हा आपण गाठू त्‍या वेळी हिंदुस्‍थान हे राष्‍ट्र ‘विश्‍वगुरु’ या पदावर विराजमान होईल. ते उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी विविध प्रकारचे दोषरूपी अफझलखान आपल्‍याला मारावे लागणार आहेत. छत्रपती शिवरायांच्‍या या पराक्रमदिनाचे स्‍मरण ठेवून आपण हे दोषरूपी अफझलखान नष्‍ट करण्‍याचा संकल्‍प करूया.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१७.१२.२०२३)