Human Trafficking : बंगालमधून गोव्यात होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी सिलिगुडी (बंगाल) येथील ५० स्वयंसेवी संस्था एकवटल्या !

पणजी, १७ डिसेंबर (वार्ता.) : बंगालमधून गोव्यात होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याविषयी १५ डिसेंबर या दिवशी सिलिगुडी (बंगाल) येथील ५० स्वयंसेवी संस्थांची बैठक झाली. बंगालमधून गोव्यात पाठवल्या जाणार्‍या युवती वेश्याव्यवसाय करण्यासाठी गोव्यात येत नाहीत. त्यांना ‘नोकरी देतो’, असे सांगून नंतर वेश्याव्यवसायात ढकलले जात आहे. हे रोखण्यासाठी गोव्यात नोकरीसाठी जाऊ पहाणार्‍या युवतींना स्वयंसेवी संस्थांद्वारे वस्तूस्थितीची माहिती देण्यात येणार आहे. बंगालमधून एखाद्या मुलीला गोव्यात नेल्याचा संशय असल्यास ती माहिती स्वयंसेवी संस्थाकडून गोव्यातील पोलिसांना दिली जाईल, तसेच गोव्यात सुटका करण्यात आलेल्या बंगालमधील मुलीच्या घरचा पत्ता गोवा पोलिसांना देण्यात येईल. गोव्यात होणार्‍या महिलांच्या तस्करीमध्ये बंगालमधून येणार्‍या युवतींचे प्रमाण अधिक आहे. ज्या मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे, त्यांना त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवून त्यांना सुरक्षा देणे आणि रोजगार मिळवून देणे, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे या स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत ठरवण्यात आले.