सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ‘हरिनाम सत्संग सोहळ्या’च्या दिंडीचे स्वागत !
देवद (पनवेल), १७ डिसेंबर (वार्ता.) – येथील सनातनच्या आश्रमात १७ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ह.भ.प. गणेश महाराज पुरस्कृत प्रतिवर्षी निघणार्या ‘हरिनाम सत्संग सोहळ्या’च्या अंतर्गत निघणार्या दिंडीचे आगमन झाले. आश्रमवासियांनी दुतर्फा हात जोडून उभे राहून दिंडीचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, तर मुलींनी हातात भगवे झेंडे घेतले होते. ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात दिंडीने आश्रमात प्रवेश केल्यावर महिलांनी फुगड्या घातल्या. टाळ वाजवत आणि अभंगगायन करीत आलेल्या वारकर्यांच्या दिंडीत पुढच्या बाजूस वीणेकरी आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला होत्या. सनातनचे साधक श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी वीणेकर्यांचे औक्षण करून आणि हार घालून स्वागत केले. तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचेही औक्षण करण्यात आले. यानंतर सर्वांना प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी देवद गावाचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री. विजय वाघमारे आणि अन्य गावकरी उपस्थित होते.