नागपूर येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात ९ जण ठार, ३ बचावले !
मृत कामगारांच्या नातेवाइकांना शासनाकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !
नागपूर – येथील बाजारगावातील सोलर एक्सप्लोझिव्ह कारखान्यात स्फोट झाल्याने यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण बचावल्याची प्राथमिक मािहती आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आस्थापनातील कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी आले असून तेथे मोठा आक्रोश चालू आहे. ही घटना १७ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वारसांना ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा यांना साहाय्य करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.