लोकमान्य टिळकांसारखे आदर्श राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत
सांगली येथे पार पडला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम
सांगली – लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात. आपल्यासाठी प्रभु श्रीरामांप्रमाणे लोकमान्य टिळकांचेही जीवन आदर्श आहे आणि त्यानुसार आपण जगलो पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शतक महोत्सव पर्दापणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प.पू. संरसंघचालक पुढे म्हणाले की,
१. लक्ष्मणपुरीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. तेथे पहाटे ४ वाजता उठून प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना हात-पाय धुण्यासाठी, तसेच स्नान करण्यासाठी गरम पाणी मिळायला हवे, यासाठी लोकमान्य टिळक यांनी स्वतः चूल पेटवली होती. त्यांच्यातील सर्वांप्रतीची आपुलकी, काळजी आणि तळमळ यांमुळे त्यांनी ही कृती केली. हे आत्मियतेचे सूत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी स्वत:चा देह राष्ट्रासाठी झिजवला, तसा देशाच्या हितासाठी शरीर व्यय करणारी माणसे सिद्ध होतील, असे उपक्रम लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने राबवले गेले पाहिजेत.
२. स्वातंत्र्यकाळात जहाल पक्षाचे नेते असलेले लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वतोपरी मानले. त्यांनी शरीर, मन आणि बुद्धी देशसेवेकरताच खर्च केली. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या माध्यमातून मागील ९९ वर्षांपासून जे उपक्रम चालू आहेत, ते टिळक विचारांचा जागर करणारे असून यापुढील काळातही ते निरंतर चालू राहिले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात प्रथम देशहिताच विचार अग्रक्रमाने केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या अध्यक्षा सौ. मनीषा काळे यांनी केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या, ‘‘संस्थेच्या वतीने यापुढील काळात उत्तम पत्रकार, लेखक, उत्तम वक्ते घडावेत यांसाठी कार्यशाळा चालू करण्यात येणार आहेत.’’ यानंतर स्वागताध्यक्ष तथा भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, भाजपचे खासदार श्री. संजयकाका पाटील, भाजपचे प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर, श्री. प्रकाशतात्या बिरजे, सर्वश्री विनायक काळे, श्रीहरि दाते, आनंद देशपांडे, माधव बापट, माणिक जाधव, प्रकाश आपटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. प्रारंभी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर दीपप्रज्वलन झाल्यावर शतक महोत्सव चिन्हाचे अनावरण करण्यात आले.
२. व्यासपिठावर सरसंघचालकांचा सत्कार झाल्यावर त्यांना श्रृंगेरी मठाचा प्रसाद देण्यात आला.
३. कार्यक्रम झाल्यावर सरसंघचालकांनी श्री मल्हारी मार्तंड दर्शन रथयात्रेचे दर्शन घेतले. या प्रसंगी प.पू. ईश्वरबुवा रामदासी, श्री. अभिमन्यू भोसले, श्री. राजेंद्र शिंदे, श्री. अर्जुन कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतया प्रसंगी लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला दिलेल्या संदेश प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, ‘‘देशाला मुक्त करणार्या आणि दिशा दाखवणार्या व्यक्तीमत्त्वांचे आदर्श अन् गुणसंपदा ही मनुष्यतेची सार्वकालिक आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर हीसुद्धा समाजाची सार्वकालिक आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो आणि लोकमान्य टिळकांचे नित्य स्मरण जागृत ठेवून आदर्श जीवननिर्मिती करत राहो, ही सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभकामना.’’ |