राज्यातील गड-दुर्गांचे मूळ स्वरूपात संवर्धन करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
नागपूर – अपुरा निधी आणि कर्मचार्यांची कमतरता यांमुळे राज्यांतील गड-दुर्ग यांची दु:स्थिती झाली, ही वस्तूस्थिती आहे. गड-दुर्ग यांच्या संवर्धनाचे काम करतांना आधुनिक पद्धतीने न करता त्यांच्या मूळ रूपात त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी त्याविषयीच्या तज्ञांची आवश्यकता आहे. अशा तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील गड-दुर्ग यांचे त्यांच्या मूळ स्वरूपात संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नागपूर येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली.
गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी राज्यशासनाकडून ‘महावारस’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत जिल्हा नियोजन मंडळातून गड-दुर्ग यांच्या संर्वधनासाठी निधी देण्यात येत आहे. येत्या ३ वर्षांसाठी महाराष्ट्र शासनाने गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी १ सहस्र ६०० कोटी रुपये इतका निधी दिला आहे.
वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविषयी बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘कोकणामध्ये वानरांच्या उपद्रवाविषयी मणीपूरप्रमाणे वानरांचे निर्बिजीकरण करण्याचा आम्ही विचार करत होतो; मात्र मणीपूर येथे निर्बिजीकरण केल्यामुळे वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली. त्यामुळे तसा उपाय आम्ही करणार नाही. माकडे पकडणार्यांना ठराविक पैसे देण्याचीही एक उपाययोजना होती; मात्र यामध्ये तेच तेच वानर पुन्हा पकडले जाण्याची शक्यता आहे. हत्तींच्या त्रासाविषयी हत्तींशी संवाद साधणार्या व्यक्तीला आम्ही पाचारण करणार आहोत. यामुळे हत्तींचे कळप आल्यास त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पुन्हा जंगलामध्ये पाठवले जाईल.’’
औरंगजेब आणि अफझलखान हे चोर, लुच्चे, लफंगेच ! – सुधीर मुनगंटीवार
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे असून त्यांच्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण केली जात असल्याचे एका मुसलमान पत्रकाराने सुधीर मुनगंटीवार यांना म्हटले, तसेच औरंगजेबादी मोगल बादशाहांचा चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे म्हटले. यावर मंत्री मुनगंटीवार यांनी ‘औरंगजेब आणि अफझलखान हे चोर, लुच्चे आणि लफंगे होते. ते राष्ट्राचे शत्रू होते. औरंगजेबाने आपल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या डोळ्यांत तप्त सळ्या भोसकल्या. अशा क्रूर बादशाहांना मुसलमानांनी आदर्श मानू नये. मुसलमानांनी ‘परमवीरचक्र’प्राप्त अब्दुल हमीद, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्यावा. औरंगजेब आणि अफझलखान हे मुसलमान म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. रावणाचेही आम्ही प्रतीवर्षी दहन करतो. तो काही मुसलमान नव्हता. त्याच्या दृष्ट प्रवृत्तींना आमचा विरोध आहे’, असे सडेतोड उत्तर दिले. ‘महंमद अली जिना यांचे पूर्वजही हिंदूच होते’, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकाराला सुनावले.