श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांख्यदर्शन मांडणार्‍या कपिलाचार्यांचे सांगितलेले श्रेष्ठत्व !

भारतीय दर्शनशास्त्राचे संस्थापक कपिलमुनी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने…

‘ज्ञानेश्वरी वाचतांना १० व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले एक वचन माझ्या वाचनात आले. मूळ संस्कृतमधील तो श्लोक आणि त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २६

अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) आहे, देवर्षींमध्ये मी नारद आहे. गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे आणि सर्व सिद्धांमध्ये (पुरुषांमध्ये) मी कपिलमुनी आहे.’’

हे वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला, ‘साक्षात् भगवंताने सांगावे इतके या कपिलमुनींचे श्रेष्ठत्व काय आहे ?’

मुळात या १० व्या अध्यायाचे नाव आहे ‘विभूतीयोग’ ! संक्षेपात (थोडक्यात) पार्श्वभूमी सांगायची, तर ९ व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, ‘हे जग, म्हणजे माझेच रूप आहे’, हे तू निःसंशयपणे लक्षात घे आणि जगात वावरतांना त्या दृष्टीने पहा, म्हणजे तू माझ्यापर्यंत अवश्य पोचशील.’  ते ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रार्थना केली (प्रार्थना १० व्या अध्यायात आली आहे.), ‘माझ्यासारख्याच्या अपूर्ण दृष्टीला व्यवहारात प्रत्ययाला येणार्‍या अगणित नाम-रूपांतील प्रत्येकामध्ये भगवंत पहाणे शक्य नाही. ‘सर्व जगत् भगवंताच्या कारणाने आहे’, हे योग्यच आहे; परंतु ‘ज्यांच्यामध्ये विशेष काही आहे, ते इतरांपासून सहज वेगळे लक्षात आले, तर त्यांच्यातील भगवंताला जाणून भगवंतापर्यंत पोचणे तुलनेने सुलभ होईल. त्यासाठी ‘या जगात भगवंताचे अस्तित्व श्रेष्ठत्वाने आणि विशेषत्वाने आहे’, अशा काही विभूतींची नावे भगवंतानेच मला सांगावी.’

भगवंताने अर्जुनाला अशा ७५ विभूतींची नावे सांगितली. ‘भूती’, म्हणजे निर्मिती आणि ‘विभूती’, म्हणजे विशेष निर्मिती. या ७५ विभूतींमध्ये मनुष्यांतील तिघांचीच नावे येतात – १. महर्षि व्यास, २. भृगु ऋषि आणि ३. कपिलमुनी (कपिलाचार्य). 

कपिलमुनींना ‘सांख्यदर्शन’ या तत्त्वज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. सनातन धर्मातील ६ दर्शनांपैकी ‘सांख्यदर्शन’ हे एक आहे. ते विश्वातील प्रथम दर्शन असून ते विश्वातील सर्व तत्त्वांची गणना करणारे आहे. सांख्यदर्शनाने विवेकी ज्ञानाला प्राधान्य दिले आहे. महर्षि कपिल यांना प्रथम दार्शनिक म्हणून गौरवण्यात येते. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी हा कपिलाचार्यांच्या जयंतीचा दिवस आहे. यासाठी कृतज्ञतापूर्वक कपिलमुनींचे स्मरण करण्यासाठी हा लेखनप्रपंच !

१. कपिलाचार्यांनी ज्ञान आणि तपस्या यांना साधनामार्ग म्हणून प्रथमच प्रस्थापित करणे 

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

सांख्यदर्शनाचा प्रभाव अन्य दर्शनांवरही पडला आहे. जैन ग्रंथांमध्ये सांख्यदर्शनातील सूत्रे येतात. उपनिषदे, श्रीमद्भागवत, महाभारत आदींमध्येही त्यांचा उल्लेख आहे. कपिलमुनींच्या आधी ‘ज्ञान’ हा केवळ चर्चेचा विषय होता आणि कर्म हा साधनेचा भाग होता. कपिलाचार्यांनी ज्ञान आणि तपस्या यांना साधनामार्ग म्हणून प्रस्थापित केले. कपिलमुनी हे श्रीविष्णूचे अंशावतार असून त्यांनी त्यांची माता देवहुती हिला तत्त्वज्ञानाचा उपदेश करून भारतीय दर्शनशास्त्राची स्थापना केली.

२. ‘सांख्यदर्शनाचे पूर्ण खंडण करूनही अद्वैत दार्शनिकांनी कपिलमुनींचे श्रेष्ठत्व स्वीकारणे’, हे सनातन धर्मप्रणित ज्ञानसंस्कृतीचे उदाहरण असणे 

सांख्यदर्शन हे मुळातच द्वैतवादी आहे. त्यामुळे पुढच्या काळात आदिशंकराचार्यांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपर्यंत अनेक विभूतींनी सांख्यदर्शनाचे पूर्ण खंडण केले. ‘सांख्य’ या द्वैत दर्शनाचे खंडण करतांनाच त्यांनी अद्वैत दर्शन प्रस्थापित केले. असे सर्व असले, तरी या महान विभूतींनी कपिलमुनींना कधी गौण ठरवले नाही. आदिशंकराचार्यांनी कपिलमुनींना ‘वैदिक ऋषि’ म्हटले आहे. अद्वैत दर्शन श्रेष्ठ आणि अंतिम असले, तरी तिथेपर्यंत पोचायला सांख्यदर्शनाच्या पायर्‍याच उपयोगी पडतात. ‘सांख्यदर्शनातील काही सूत्रे अद्वैत दर्शनातही आहेत’, यावरून हे लक्षात येते.

या महान विभूतींनी त्यांनी खंडण केलेल्या सांख्य तत्त्वज्ञानातील चांगली आणि चिरंतन तत्त्वे आदरपूर्वक स्वीकारली. त्यांनी कपिलमुनींच्या तत्त्वज्ञानाचे खंडण करूनही त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. यावरून ‘सनातन धर्मप्रणित संस्कृती ही खर्‍या अर्थाने ज्ञानसंस्कृती आहे’, हे समजून येते.

३. भारतीय तत्त्वज्ञांनी दर्शनांची श्रेष्ठता सांगतांना सांख्यदर्शनातील सूत्रे उद्धृत करणे 

अ. स्वामी विवेकानंद यांनी ‘सनातन धर्माच्या संस्कृतीमध्ये व्यक्ती, मन, जग आदींचा विचार किती मूलगामी पद्धतीने केला आहे’, हे सांगतांना कपिलाचार्यांच्या सांख्यदर्शनातील सूत्रांचा उल्लेख केला.

आ. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात इस्लाम आणि ख्रिश्चन यांच्या सनातन धर्मावर होणार्‍या आक्रमणांचा वैचारिक विरोध करतांना पू. रामस्वरूपजी गर्ग यांनी सांख्यदर्शनातील सूत्रांचाच उपयोग केला.

४. सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान

‘पुरुष आणि प्रकृती’ ही २ भिन्न तत्त्वे असून ती अनादी आहेत. ‘प्रकृती आणि पुरुष’ या तत्त्वांच्या संदर्भातील अज्ञानामुळे माणूस जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. मनुष्याला ‘प्रकृती आणि पुरुष’ ही भिन्न आणि स्वतंत्र तत्त्वे आहेत’, याचे ज्ञान झाल्यावर माणूस जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.

५. ‘पुरुष-प्रकृती’ संबंध उलगडून सांगतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण

‘पुरुष आणि प्रकृती’ या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) सांगितलेली एक गोष्ट मला स्मरली. ‘पुरुष आणि प्रकृती’ यांच्यातील संबंध समजावून सांगतांना प.पू. बाबांनी सांगितले, ‘समजा तुम्ही एखाद्या बंद घराच्या दारावर बाहेरून थाप दिली आणि आतमध्ये पती (पुरुष) अन् पत्नी (प्रकृती) दोघेही असतील, तरच पत्नी ‘ओ’ देऊन दार उघडेल. ती तुमची विचारपूस करील. पती आतमध्ये तसाच बसून राहील; पण पती घरात नसेल, तर पत्नी ‘ओ’ सुद्धा देणार नाही.’

वरील सर्व विवेचनावरून ‘कपिलमुनींचे स्मरण सनातन धर्माच्या मंडळींनी का ठेवायला हवे ?’, हे लक्षात येईल. सनातन धर्मप्रणित संस्कृती रक्षणाचा आणि संवर्धनाचा विचार करतांना त्या संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतांना ‘तिच्या प्रवर्तकांचे स्मरण करणे’, आवश्यक आहे. त्यासाठी वैदिक ऋषि आणि विश्वातील प्रथम दार्शनिक कपिलाचार्य यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन !’

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२३)