Portuguese Citizenship : ३ वर्षांत २ सहस्रांहून अधिक गोमंतकियांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले ! – परराष्ट्र मंत्रालय
लोकसभा हिवाळी अधिवेशन
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : मागील ३ वर्षांत २ सहस्रांहून अधिक गोमंतकियांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्यासाठी विभागीय पारपत्र कार्यालयाला भेट दिली आहे. याच कालावधीत ११४ जणांचे पारपत्र रहित झालेले आहे. काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाने उत्तरात ही माहिती दिली.
खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी परराष्ट्र मंत्रालयाला भारतीय पारपत्र रहित झाल्याची किती प्रकरणे आहेत ? आणि याविषयी भारत सरकारने पोर्तुगाल सरकारशी चर्चा केली आहे का ? असे विचारले होते. उत्तरादाखल परराष्ट्र मंत्रालयाने ‘देशात ‘पारपत्र कायदा १९६७’ आणि ‘नागरिकत्व कायदा १९५५’ अस्तित्वात असल्याने याविषयी कोणताही प्रश्न नाही’, असे सांगितले. पोर्तुगाल सरकार वर्ष १९६१ च्या पूर्वी (गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी) पोर्तुगालचा नागरिक असलेल्या गोमंतकियाला, तसेच त्यांच्या पुढील दोन पिढ्यांना पोर्तुगीज नागरिकत्व देते. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारल्याने युरोप संघात कुठेही काम करता येते. याचा सहस्रो गोमंतकियांनी लाभ घेतला आहे. ‘हेन्ली पासपोर्ट इन्डेक्स २०२३’नुसार पोर्तुगीज पारपत्र हे जगातील पाचवे शक्तीशाली पारपत्र असून या सूचीत भारताचे स्थान ८३ वे आहे. ‘पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती ही भारताची नागरिक रहाते कि नाही ?’, हा सध्या प्रश्न आहे. पोर्तुगीज कायद्यानुसार लिस्बन (पोर्तुगालची राजधानी) येथे एकदा जन्मनोंदणी झाल्यानंतर तो पोर्तुगालचा नागरिक बनतो; मात्र भारताच्या ‘नागरिकत्व कायदा १९५५’चे कलम ९(१) नुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास तो भारताचा नागरिक रहात नाही.