Mhadei Water Dispute : म्हादईवरील प्रकल्प रखडले : केंद्रशासन पर्यावरण दाखला देत नाही !
म्हादई जलवाटप तंटा
कर्नाटक हिवाळी अधिवेशन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची खंत
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : म्हादईचे पाणी वळवण्यासाठीच्या प्रकल्पांना केंद्रशासन पर्यावरण दाखला देत नाही आणि यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. पाणी वळवण्यासंबंधी सर्व प्रकल्पांसाठी राज्यशासनाने निधीची तरतूदही केलेली आहे, अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले,
‘‘म्हादई प्रकल्प राज्यशासनाला लवकरात लवकर चालू करायचा होता; मात्र केंद्रशासनाने अनुमती न दिल्याने तो रखडला आहे. यंदा पाऊस समाधानकारक न पडल्याने कर्नाटक राज्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. राज्यातील पाणी टंचाईविषयी राज्यशासनाने पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. केंद्राने मागील अर्थसंकल्पात कर्नाटकला ५ सहस्र ३०० कोटी रुपये देणार असल्याचे म्हटले होते; मात्र आजतागायत यातील एकही पैसा मिळालेला नाही. गोव्यात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी याविषयावर बोलावे.’’