२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड धारातीर्थ यात्रेचे (मोहिमेचे) आयोजन !
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रा !
सांगली, १६ डिसेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२४ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दुर्ग श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे. संपूर्ण दुर्ग पहाण्यासाठी बुधवार, २४ जानेवारी या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या आत श्री रायरेश्वरावर पोचावे. हा दिवस गडदर्शनासाठी आहे. यानंतर २४ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता श्री तुळजाभवानीदेवीच्या आरतीने मोहिमेस प्रारंभ होईल.
या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. मोहिमेसाठी प्रत्येकाने ८ ते १० वेळ पुरेल-टिकेल एवढी शिदोरी, दोन जलकुंभ, पातळ सतरंजी-चादर आणणे आवश्यक आहे. प्रत्येकाने नेहमीचा वेष आणि भारतीय पद्धतीची पांढरी टोपी घालावी, तसेच कानापर्यंत उंचीची काठी आणली पाहिजे. समारोपाच्या दिवशी म्हणजे २८ जानेवारीला प्रत्येकाने ‘भगवा फेटा’ बांधलाच पाहिजे.
२. मोहिमेतील प्रत्येक धारकर्याने ५० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
३. मोहिमेची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक धारकर्याने नित्य पळणे, जोर-बैठका, सूर्यनमस्कार, असा व्यायाम तात्काळ चालू करावा, तसेच ‘राजा श्री शिवछत्रपती’ ग्रंथाचे नित्य वाचन चालू करावे.