साधकांच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान करून आणि अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडून साधकांना साधनेत अग्रेसर करणारे अद्वितीय महान परात्पर गुरु डॉ. आठवले !
३ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधना चालू केल्यावर त्यांना ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, याप्रमाणे प्रत्येक कृती करायला हवी’, हे कसे शिकायला मिळाले’, ते पाहिले. आजच्या भागात ‘सत्संगात जिज्ञासूंचे शंकानिरसन करून त्यांना प्रत्यक्ष साधनेतील कृती करायला कसे उद्युक्त केले ?’, आणि ‘त्याचा साधनेत प्रगती करायला कसा लाभ झाला ?’, ते दिले आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/742679.html
४. ‘सत्संगात साधनेत येणार्या अडचणी किंवा शंका यांचे चांगल्या प्रकारे निरसन केले जात असल्यामुळे साधना करण्याची प्रेरणा मिळणे
४ अ. सत्संगात साधना करायला सांगितल्यावर साधनेत येणार्या अडचणी विचारून त्यांचे निरसन केले जाणे : ‘सत्संगात तात्त्विक गोष्ट सांगण्याच्या समवेत प्रत्यक्ष कृती करण्याला अधिक महत्त्व दिले जात होते, उदा. कुलदेवता आणि दत्त यांचे नामजप करायला सांगितल्यावर नामजप करण्यात येणार्या अडचणी विचारल्या जाऊन त्यांचे निरसन केले जात असे. सत्संगसेवकाला जिज्ञासूच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही, तर तो उत्तरदायी साधकांना विचारून पुढच्या सत्संगात उत्तर सांगत असे.
४ आ. शंकांची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळाल्यामुळे पुढच्या टप्प्याची साधना करण्यास प्रेरणा मिळणे : मी संकष्टी चतुर्थी आणि अन्य प्रासंगिक उपवास करत असे. मी सत्संगात विचारले, ‘हे चालू ठेवावे का ?’ तेव्हा सत्संगसेवकाने मला त्यामागील शास्त्र सांगितले, ‘‘उपवास करणे’, ही कर्मकांडातील साधना असून ‘नामजप करणे’, ही उपासनाकांडातील, म्हणजे पुढच्या टप्प्याची साधना आहे. ‘नामजप करणे’ हे अधिक सूक्ष्म स्तरावरील आहे. उपवासापेक्षा नामामुळे अधिक वेळ भगवंताशी अनुसंधान रहाते. ‘माणूस पुढच्या इयत्तेत गेल्यावर मागच्या इयत्तेचा अभ्यास करतो का ?’’ अशा प्रकारे सत्संगात शास्त्रशुद्ध उत्तरे मिळत गेल्यामुळे आपोआपच साधना करण्याचा माझ्या मनाचा निश्चय होऊन पुढच्या टप्प्याची साधना करायला मला प्रेरणा मिळाली.
४ इ. प्रत्येक २ – ३ मासांनी सनातन संस्थेचे प्रचारसेवक किंवा उत्तरदायी साधक सर्व साधकांना मार्गदर्शन करत असणे : या व्यतिरिक्त प्रत्येक २ – ३ मासांनी सनातन संस्थेचे प्रचारसेवक किंवा उत्तरदायी साधक जवळपासच्या गावातील सर्व साधकांना एकत्र करून मार्गदर्शन करत असत. त्यामुळे साधकांच्या मनातील अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे मिळत आणि अन्य साधकांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून शिकता येत असे.
४ ई. साधकांच्या अनुभूतींचे विश्लेषण केले जाणे : सत्संगात साधक त्यांच्या अनुभूती सांगायचे. त्याचे विश्लेषणही केले जायचे. साधकांचे शंकानिरसन करून साधनेसाठी त्यांच्या बुद्धीचा निश्चय करून घेऊन त्यांना साधनेत पुढे पुढे नेण्याची ही पद्धत मला फारच भावली. मला साधना किंवा अध्यात्म यांविषयी काहीच ठाऊक नव्हते. माझ्या मनात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत गेल्याने माझी साधनेची प्रेरणा जागृत राहून तळमळ वाढत गेली आणि माझी साधना विनाविकल्प पुढे चालू राहिली.
५. सत्संगात सेवा करणारे साधक ‘सेवा करतांना त्यांच्यात कसे पालट होत आहेत ?’, हे सांगत असणे आणि ते ऐकून सेवा करण्याची प्रेरणा मिळणे
सेवा करणारे साधक सत्संगात ‘सेवा कशी झाली ? आणि सेवा करतांना त्यांच्यात कसे पालट होत आहेत ?’, हे सतत सांगायचे. त्यामुळे ‘आपल्यालाही सेवा करता यायला हवी’, अशी मला प्रेरणा मिळायची. ‘केवळ ऐकण्यापेक्षा त्याप्रमाणे कृती करणे महत्त्वाचे आहे’, हेही यातून साधकांच्या मनावर बिंबवले जायचे. सत्संगात श्रवणभक्तीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिले जायचे आणि तो विषय चांगल्या प्रकारे सांगितला जायचा. त्यामुळे सत्संगात येऊ लागल्यावर एक मासाच्या आतच मी प्रत्यक्ष सेवा करायला आरंभ केला.
आरंभी मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे प्रती सप्ताह वितरण करणे, तसेच तेव्हा जवळ आलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी समाजातून अर्पण गोळा करणे इत्यादी सेवा करायला आरंभ केला.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक प्रकारच्या सेवांची केलेली निर्मिती आणि त्याचा साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी झालेला लाभ !
६ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची प्रकृती, रुची आणि वय यांनुसार वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देणे : प.पू. गुरुदेवांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी अनेक सेवांची निर्मिती केली. त्यांनी प्रत्येकाची प्रकृती, रुची आणि वय यांनुसार विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या, उदाहरणार्थ धर्मप्रचाराची तळमळ आणि शरीरप्रकृती चांगली असलेल्या साधकांसाठी अध्यात्मप्रसाराच्या सेवा, वयस्कर साधकांसाठी ग्रंथ आणि नियतकालिके यांच्या वितरणाचा हिशोब ठेवणे किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या घड्या घालणे, त्यावर वर्गणीदारांचे पत्ते चिकटवणे इत्यादी अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. अध्यात्मप्रसाराच्या या सेवा, म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्याच सेवा होत्या. याचा मला साधनेत पुढे जाण्यासाठी पुष्कळ लाभ झाला.
६ आ. सेवा करतांना मनात केवळ सेवेचेच विचार असल्यामुळे मन मायेच्या विचारांपासून दूर रहाणे आणि त्यामुळे ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येऊन सेवेतून आनंद मिळणे : सेवा करतांना माझ्या लक्षात आले, ‘मन सेवेत पटकन गुंतते. त्यामुळे मी जितका वेळ सेवा करत असेन, तितका वेळ माझ्या मनात सेवेविना अन्य कुठलेही विचार नसायचे आणि सेवा झाल्यावरही काही वेळ त्या सेवेविषयीचे विचार मनात असायचे.’ याचा सर्वांत मोठा लाभ, म्हणजे तितका कालावधी मी मायेतील विचारांपासून दूर रहात असे. ‘मन सेवेत गुंतल्यामुळे आणि एकाग्र झाल्यामुळे अधिक प्रमाणात ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येते अन् आनंद मिळतो’, हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे कितीही सेवा केली, तरी थकवा न येता मला उत्साह वाटत असे.
यातून व्यावहारिक कामे आणि ईश्वरी सेवा यांतील भेद माझ्या लक्षात आला.
६ इ. इतर संप्रदायात नेहमीसाठी सेवा उपलब्ध नसणे : अन्य आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांमध्ये नेहमी करता येणार्या सेवा उपलब्ध नसतात. असल्या, तरी फारच थोड्या असतात. त्यामुळे संप्रदायातील सर्वांना त्या सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यांना एखाद्या मासात किंवा वर्षातून काही कालावधीसाठी काही सेवा उपलब्ध असतात.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सध्याच्या काळाला अनुसरून अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडल्यामुळे ते पटकन समजणे आणि बुद्धीजिवी वर्गालाही त्याचा लाभ होणे
सत्संगातील विषय टक्केवारी आणि तुलनात्मक सारण्या इत्यादी प्रकारे वैज्ञानिक भाषेत सांगितले जायचे. त्यामुळे ‘एखाद्या विषयातून नक्की काय ग्रहण करायचे आहे ?’, हे सहज लक्षात यायचे, उदाहरणार्थ ज्ञानदानाचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी बनवलेली एक सारणी पुढे दिली आहे.
अध्यापनाचे (ज्ञानदानाचे) महत्त्व
याप्रमाणेच ‘विश्वास’ आणि ‘श्रद्धा’ किंवा ‘श्री’ आणि ‘ॐ’ यांतील भेद, ‘अंतर्मन आणि बाह्यमन कसे कार्य करते ?’, इत्यादी अनेक गोष्टी त्यांनी टक्केवारी आणि तुलनात्मक सारणी देऊन स्पष्ट केल्या आहेत. प.पू. गुरुदेवांची अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडण्याची ही शैली आताच्या काळाला अनुरूप आणि अतिशय प्रभावी आहे. कलियुगातील बुद्धीजिवी वर्गालाही त्याचा लाभ होत आहे.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सत्संगात कुठले विषय कसे घ्यावेत ?’, याविषयी मार्गदर्शक सूत्रे सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ यात लिहून ठेवणे
‘सत्संगात कुठले विषय कसे घ्यायचे ?’, याविषयी परात्पर गुरुदेवांनी काही मार्गदर्शक सूत्रे ‘अध्यात्माचे प्रस्ताविक विवेचन’ या ग्रंथांमध्ये लिहून ठेवली आहेत. त्यानुसार साधना केल्यामुळे सर्व साधकांना चांगल्या प्रकारे लाभ होत आहे. ‘सनातनचे साधक ज्या वेगाने साधनेत जलद गतीने प्रगती करत आहेत’, ते पाहून ही गोष्ट सहज लक्षात येते.
९. साप्ताहिक आणि पाक्षिक अभ्यासवर्ग
या व्यतिरिक्त साप्ताहिक आणि पाक्षिक अभ्यासवर्ग असायचे. यात सनातनच्या ग्रंथातील सूत्रांचा अभ्यास घेतला जायचा. पुढे जेव्हा मी सत्संग घेऊ लागलो किंवा जिज्ञासूंच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागलो, तेव्हा मला याचा पुष्कळ लाभ झाला, म्हणजेच समष्टी साधना करणे सोपे गेले.
या ज्या काही कार्यपद्धती परात्पर गुरुदेवांनी घालून दिल्या होत्या, त्या अतिशय आदर्श आणि अभ्यासपूर्ण होत्या. ज्याच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती किंवा साधनेची तळमळ आहे, त्याला यातून चांगली दिशा मिळते आणि साधनेत प्रगती करता येते.’
परात्पर गुरुदेवांनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम । (अर्थ : हे लिखाण माझे नाही.)’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१२.२०२२)