India Pakistan Relation : पाकिस्तानला वाचवायचे असेल, तर त्याला भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील ! – पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योजक साजिद तरार
वॉशिंग्टन – पाकिस्तानला वाचवायचे असेल, तर त्याला भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील, असे विधान मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योजक साजिद तरार यांनी एका मुलाखतीत केले. ते पुढे म्हणाले, ‘‘भारताशी व्यापार आणि पर्यटन वाढवण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाला पावले उचलावीच लागतील. भारताशी व्यापार करावाच लागेल; कारण हा पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी हे खंबीर नेते आहेत.’’
पाकिस्तानला भेट देणे, हे मोदी यांचे धाडसी पाऊल होते !
साजिद तरार पुढे म्हणाले की, ‘‘पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मोठी राजकीय जोखीम पत्करून पाकिस्तानला भेट दिली होती. ते पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या घरी गेले होते. हे फार धाडसी पाऊल होते. ते एक सामर्थ्यशाली नेते आहेत. मी त्यांचा चाहता आहे. माझे भारताशी घट्ट नाते आहे. मला भारतात अपार प्रेम मिळते. आपण (भारत आणि पाक) एकाच उपखंडात शतकानुशतके रहात आहोत.’’