Drug Racket : मोरजी (गोवा) येथे १ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह रशियाचा नागरिक कह्यात

अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला कह्यात घेतले

पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) : अमली पदार्थविरोधी पथकाने मोरजी येथे मोठी कारवाई करून १ कोटी ७५ सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला कह्यात घेतले आहे. या वेळी संशयिताकडून उच्च दर्जाचे ‘डायडपोनिक्रो’ व्हीड, चरस आणि ‘एल्.एस्.डी.’ अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाला मोरजी येथे अमली पदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष यानिमित्ताने मोरजी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. येथे येणार्‍या पर्यटकांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने संशयिताने हे अमली पदार्थ आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

गोव्यात ३ वर्षांत ५३८ किलो अमली पदार्थ कह्यात

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय

पणजी : पोलिसांनी वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत गोव्यात ५३७ किलो ५८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेतले आणि यामध्ये ५३४ किलो हा गांजा होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतीच संसदेत ही माहिती दिली. खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्‍नावर हे उत्तर देण्यात आले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय उत्तरात पुढे म्हणाले, ‘‘राज्यात ३ वर्षांत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ४२१ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये ५४४ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट झाले आहे, तर ४९ जणांवर कारवाई झालेली आहे.’’