पुणे येथे वाय्.सी.एम्. रुग्णालयात रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या बनवून ६८ सहस्र रुपयांचा अपहार !
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय्.सी.एम्.) रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांच्या ‘कॅश काउंटर’वर (पैसे देवाण-घेवाणीसाठी केलेली व्यवस्था) नेमलेल्या कामगाराने रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या सिद्ध करून ६८ सहस्र रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी ‘बीव्हीजी’ आस्थापनाच्या कामगाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आदित्य खंडागळे असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. संजीव भांगले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी आदित्य हा ‘बीव्हीजी’ आस्थापनाकडून वाय्.सी.एम्. रुग्णालयात कामाला आहे. त्याला ‘कॅश काउंटर’च्या कामकाजासाठी रोख रक्कम स्वीकारण्यासाठी नेमण्यात आले आहे. त्याने रुग्णालयातील रक्तपेढी विभाग, ‘एक्स-रे विभाग’, ‘सोनोग्राफी विभाग’, शवगृह विभाग यांसाठी रुग्णालयाने निश्चित केलेल्या रकमेच्या बनावट पावत्या सिद्ध केल्या. रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांच्याकडून निश्चित केलेल्या रकमेप्रमाणे पैसे घेऊन तो त्यांना तशी पावती देत असे; मात्र जमा झालेली रक्कम त्याने रुग्णालयाच्या खात्यावर जमा न करता अल्प रकमेचा भरणा केलेल्या खोट्या पावत्या दाखवून रुग्णालयाची ६८ सहस्र २६० रुपयांची फसवणूक केली.