साधकांना साहाय्य करण्यास तत्पर असणारे चि. तुषार भास्करवार आणि झोकून देऊन सेवा करणार्या चि.सौ.कां. निकिता झरकर !
१७.१२.२०२३ (मार्गशीर्ष शुक्ल पंचमी) या दिवशी चंद्रपूर येथील चि. तुषार भास्करवार आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या चि.सौ.कां. निकिता झरकर यांचा शुभविवाह होत आहे. त्या निमित्ताने चि. तुषार यांचे सहसाधक आणि चि.सौ.कां. निकिता यांचे कुटुंबीय अन् सहसाधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. तुषार भास्करवार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. गीता कोंतमवार, मूल, जिल्हा चंद्रपूर.
अ. ‘दादाचा स्वभाव मोकळा आहे. तो प्रत्येक सेवा आनंदाने करतो.
आ. दादा नेहमी सहसाधकांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्यातील गुणांचे कौतुक करतो.’
२. सौ. दीपाली सिंगाभट्टी, चंद्रपूर
अ. ‘आरंभी ‘सोशल मिडिया’च्या (सामाजिक माध्यमाच्या) संदर्भातील सेवा कशा करायच्या ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा तुषारदादाने मला या सर्व सेवा तळमळीने शिकवल्या.
आ. कधी कधी त्याला दिवसभर निरनिराळ्या सेवा असल्यामुळे वेळ मिळत नसे. अशा वेळी तो रात्री १० वाजल्यानंतर सेवा चालू करायचा. काही वेळा तो रात्री उशिरापर्यंत सेवा करायचा.
इ. मला सेवेचा ताण आल्यावर ‘काकू ताण घेऊ नका. सेवा वेळेत होईल’, असे म्हणून तो माझा ताण हलका करायचा.’
३. सौ. मंगला दर्वे (वय ५८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चंद्रपूर
३ अ. इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असणे : ‘तुषारदादा ‘सोशल मिडिया’च्या संदर्भातील सेवा करतो. मला ‘सोशल मिडिया’च्या सेवेच्या संदर्भात अडचण असेल, तेव्हा मी दादाला त्याविषयी विचारते. तेव्हा तो कितीही व्यस्त असला, तरी माझ्या अडचणी समजून घेतो आणि त्या सोडवण्यासाठी मला साहाय्य करतो.
३ आ. संयमी : साधकांना सेवेच्या संदर्भातील एखादे सूत्र समजले नाही आणि त्याला त्याविषयी पुनःपुन्हा विचारले, तरी तो न कंटाळता आणि न चिडता त्यांना ते शांतपणे समजावून सांगतो.’
४. सौ. सुषमा चंदनखेडे (वय ५० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चंद्रपूर
अ. ‘दादा लहान-मोठ्या, अशा सर्वांशी आदराने आणि नम्रतेने बोलतो.
आ. दादाला सेवा करतांना अडचणी आल्या, तरी तो त्याविषयी कधीही गार्हाणे करत नाही. आहे त्या परिस्थितीत तो सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’
५. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व साधक : ‘दादामध्ये सेवेची तीव्र तळमळ आहे. सर्व साधकांना परिपूर्ण सेवा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तो सदैव तत्पर असतो.’
चि.सौ.कां. निकिता झरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्री. विवेक झरकर (चि.सौ.कां. निकिता यांचे वडील), सौ. प्रज्ञा झरकर (आई), सौ. स्नेहा हाके (मोठी बहीण), श्री. सचिन हाके (मोठे मेहुणे), श्री. वेदांत झरकर (लहान भाऊ)
१ अ १. उत्साही : ‘निकिता रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करते. तिथे ती वेगवेगळ्या सेवा, उदा. नवीन पदार्थ बनवणे इत्यादी उत्साहाने शिकते. तातडीची सेवा आली, तर कुठल्याही वेळी सेवा करण्यास ती उत्साहाने सिद्ध असते.
१ अ २. सर्व वयोगटातील साधकांशी तिची लवकर जवळीक होते.
१ अ ३. पाककौशल्य : तिने बनवलेला कुठलाही पदार्थ चविष्ट असतो. उपलब्ध साहित्यातही ती रुचकर पदार्थ बनवते. हे सर्व ती मनापासून करते. घरी गेल्यानंतर ती तिच्या वडिलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवून खायला घालते.
१ अ ४. प्रेमभाव
अ. कुटुंबियांतील कुणी रुग्णाईत असल्यास निकिता त्यांच्यासाठी रामनाथी आश्रमातील संतांना विचारून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला, तसेच ‘सांगितलेले उपाय ते करतात कि नाही ?’, याचा पाठपुरावा घेते. ती कुटुंबियांना लरामनाथी आश्रमातील विभूती पाठवते.
आ. काही दिवसांपूर्वी तिचा लहान भाऊ श्री. वेदांत (वय २० वर्षे) रुग्णाईत असल्याने वैद्यांनी त्याला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. त्या कालावधीत त्याची काळजी घेत तिने स्वतःकडील सेवाही सांभाळल्या.
इ. ती तिच्या खोलीतील वयस्कर साधिकांची काळजी घेते. ती त्यांना आधार देते आणि त्यांना आवश्यक ते साहाय्य करते.
१ अ ५. चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती : तिला अनेक सेवा असल्याने ती व्यस्त असते. तिला दुचाकी आणि चारचाकी गाडी शिकायची होती. तेव्हा पुष्कळ सेवा असूनही ती वेळ काढून दुचाकी आणि चारचाकी गाडी शिकली. ती नियमितपणे चारचाकी गाडी चालवण्याचा सरावही करत असे.
१ अ ६. गुरुकार्याची तळमळ : स्वयंपाकघरात साधक अल्प असतांना शारीरिक त्रास होत असला, तरी ती स्वतःचा विचार न करता झोकून देऊन सेवा करते.
१ अ ७. भाव : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या संत, वय ४६ वर्षे) आणि सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्याप्रती तिचा पुष्कळ भाव आहे.’
२. सौ. सायली सिद्धेश करंदीकर (साधिका), ढवळी, फोंडा, गोवा.
२ अ. नीटनेटकेपणा : ‘दिवसभर स्वयंपाकघरात सेवा करून निकिताला पुष्कळ दमायला व्हायचे; परंतु खोलीत आल्यावर तिला नेमून दिलेली खोलीची स्वच्छता ती नियमितपणे करत असे, तसेच सेवेच्या ठिकाणी कुठे काही अव्यवस्थित दिसले, तर ती लगेच ते व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवत असे.
२ आ. समाधानी : आश्रमात काही वेळा नित्योपयोगी वस्तूंचे प्रदर्शन असते. त्या वेळी ती आवश्यक असलेली वस्तूच घेते. त्यासाठी ती आई-वडिलांचे मतही घेते. आईने तिला काही साहित्य पाठवले, तर ती त्यात समाधानी असते.
२ इ. ‘ती वयाने लहान असूनही तिला मायेतील वस्तूंची आसक्ती अत्यल्प आहे’, असे मला जाणवते.
२ ई. इतरांचा विचार करणे : एखादा पदार्थ अल्प प्रमाणात असेल, तर ‘हा पदार्थ कोणाला देऊ शकतो ?’, असा विचार ती करते, उदा. शहाळी फोडली असतील, तर ‘कोणी रुग्णाईत आहे का ? ज्यांना याची आवश्यकता आहे, त्यांनाच देऊया’, असा विचार ती करते.
२ उ. स्वतःला पालटण्याची तळमळ : तिच्याकडून एखादी चूक झाली किंवा ‘एखाद्या स्वभावदोषावर मात कशी करायची ?’, हे तिला समजले नाही, तर ती लगेच दायित्व असलेल्या साधिकेशी बोलून त्याविषयी मार्गदर्शन घेते. ती त्यावर चिंतन करून ‘काय प्रयत्न करणार ?’, हे ठरवते आणि प्रयत्न चालू करते.
२ ऊ. आज्ञापालन : पू. रेखाताई किंवा सौ. सुप्रियाताई यांनी एखादी गोष्ट सांगितली की, ती मनात कोणताच किंतु आणत नाही. ती लगेच आज्ञापालन करते. त्या वेळी तिला वाटते, ‘उत्तरदायी साधकच माझे पहिले गुरु आहेत आणि त्यांचे ऐकण्यानेच माझी साधना होणार आहे.’
२ ए. गुरूंवरील श्रद्धा : कुठलाही प्रसंग घडला किंवा तिच्याकडून एखादी गंभीर चूक झाली, तर ती प्रतिदिन ध्यानमंदिरात जाऊन गुरुदेवांना आत्मनिवेदन करून सर्व सांगते. त्या वेळी तिची ‘गुरु मला योग्य दिशा देणार आहेत’, अशी श्रद्धा असते.
२ ऐ. संतांप्रतीचा भाव : मागील अनेक वर्षांपासून निकिता पू. रेखाताईंच्या समवेत सेवा करत आहे. ‘त्या संत आहेत, म्हणजे गुरुस्वरूपच आहेत’, असा तिचा भाव असतो.
२ ओ. जाणवलेले पालट
२ ओ १. नवनवीन सेवा शिकणे : प्रथम ती मोजक्याच सेवा करायची. त्यानंतर हळूहळू तिने एकेक करत अनेक सेवा शिकून घेतल्या, उदा. ‘स्वयंपाकघरात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी अन्य गावांतून वेगवेगळे साधक येतात. त्या साधकांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा देणे, स्वयंपाकघरातील भांड्यांच्या साठ्याची सर्व पहाणी करून त्यांची सूची करून खोक्यांवर नावे (‘लेबल्स’) लिहिणे; लोणचे, मसाले, चटणी यांचा साठा तपासणे’ इत्यादी सर्व सेवा आणि त्यांतील बारकावे तिने अल्पावधीत शिकून घेतले.
२ ओ २. प्रेमभाव वाढल्याचे जाणवणे : पूर्वी तिच्यामध्ये ‘प्रेमभाव’ हा गुण अल्प होता. जसजशी ती सर्व सेवा दायित्वाने करू लागली, तसतसा तिच्यातील प्रेमभाव वाढू लागला. पूर्वी स्वयंपाकघरातील अनेक साधकांना तिची भीती वाटायची. साधकांना तिच्याशी बोलता येत नसे; पण आता तिने त्यावर पुष्कळ प्रयत्न करून स्वतःमध्ये पालट केला आहे. आता साधकांना तिचा आधार वाटतो.
२ ओ ३. अधिकारवाणीने बोलणे न्यून होऊन बोलण्यातून ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ जाणवणे : सहसाधकांची काही चूक झाली, तर ती लगेच तत्त्वनिष्ठपणे सांगते. पूर्वी चूक सांगतांना तिच्या बोलण्यात अधिकारवाणी जाणवायची; पण आता तिचा ‘साधकाची गुरूंना अपेक्षित अशी साधना व्हावी’, असा विचार असतो आणि तशी तळमळही जाणवते.
२ ओ ४. अंतर्मुखता निर्माण होणे : पूर्वी दायित्व असलेल्या साधिकेने एखादी चूक सांगितली, तर ‘त्यांनी मला समजून घ्यायला हवे होते’, असे तिला वाटायचे. ‘मी कशी योग्य आहे ?’, हे ती सांगत असे; परंतु आता तिच्यात पुष्कळ अंतर्मुखता आली आहे. त्यामुळे ‘प्रत्येक चुकीच्या मुळाशी जाऊन ती पुढील सर्व प्रक्रिया करते आणि त्यावर कृती अन् मन यांच्या स्तरांवर प्रयत्न करते’, असे मला जाणवले. आता तिला चुकांविषयी खंतही वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ८.१२.२०२३)