करमणूक सुयोग्य हवी !
आज अनेक चित्रपट, ‘वेब सिरीज’, अन्य सामाजिक प्रसारमाध्यमे यांमधून दाखवण्यात येणारी अनैतिकता, अश्लीलता, हिंसा युवकांना अधोगतीच्या मार्गावर नेत आहे. काल्पनिक चित्रणाला वास्तव समजून त्याचे अनुकरण करण्याचा भाग वाढला आहे. चित्रपट हा ज्याप्रमाणे समाजमनाचा आरसा असतो; त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकावर आणि विशेषकरून युवकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतो. करमणुकीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणे हाही भाग चित्रपटातून होतो आणि हिंदूंच्या जाज्ज्वल्य इतिहासाविषयी अनभिज्ञ असलेले, धर्मशिक्षण आणि धर्माभिमान नसलेले हिंदु धर्माची खिल्ली उडतांना त्याचा आनंद घेतात, हे दुर्दैवी आहे. काही वेळा चित्रपटात राष्ट्रपुरुषांचाही अवमान केलेला असतो. हिंदूंमध्ये पुरेसा राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान निर्माण करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्याचे त्यांना काही वाटत नाही.
अनेक मराठी, हिंदी ‘टीव्ही शो’च्या माध्यमातून सण, देवता यांच्याविषयी चुकीची आणि अवमानकारक मांडणी केली जाते. ‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. याला कुठेतरी पूर्णविराम दिलाच पाहिजे. आज सामाजिक प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने विनोद, नैसर्गिक आपत्ती, युद्धाच्या बातम्यांसह अनेक अफवा जगभर जाऊ शकतात, तर हिंदु धर्म, सण, परंपरा यांच्या अवमानाविरुद्धची ‘पोस्ट’ जगभर जाऊ शकत नाही का ? जाऊ शकते; पण ती कुणीतरी प्रसारित करायला हवी.
घरात परंपरेने सांगितलेल्या प्रथा, परंपरांपेक्षा ‘टीव्ही शो’, ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सॲप’ आदी प्रसारमाध्यमांवर आलेली माहिती योग्य आहे, असा विश्वास असतो. भारतातून पाश्चिमात्य देशात गेलेले ज्ञान तेथून परत भारतात येते, तेव्हा ते भारतातील जनतेला खरे वाटते. भविष्यातील अनैतिकतेची अराजकता, हिंसेचा प्रकोप टाळायचा असेल, तर सुसंस्कारित करायला हवे मन. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे ! म्हणून करमणूक ही शुद्ध, निर्मळ आणि निखळ आनंद देणारी असावी !
– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी.