निवासी आणि अनिवासी सर्वच आश्रमशाळांना अनुदान देण्यात येईल ! – गुलाबराव पाटील, मंत्री

श्री. गुलाबराव पाटील

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी आणि अनिवासी आश्रमशाळेतील शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्रशासनाच्या धर्तीवर १०० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव वित्तखात्याकडे पाठवला आहे. आपण सर्वच शाळांना अनुदान देणार आहोत, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषद सभागृहात सांगितले. या संदर्भातील लक्षवेधी आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केली होती.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “राज्यात ३२२ आश्रमशाळांचे अनुदानासाठी प्रस्ताव आले होते. त्यापैकी ३४ शाळांना अनुदानास अनुमती दिली होती. उर्वरित २८८ आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ९६ आणि असहकार आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ६९ अशा एकूण १६५ निवासी/अनिवासी आश्रमशाळांना कायमस्वरूपी अनुदान देण्यात येईल.’’