बेरोजगारी आणि पेपरफुटी यांवरून विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राज्य सरकारचा निषेध !

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी बेरोजगारी आणि पेपरफुटी प्रकरण यांसारख्या सूत्रांवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या युतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, सचिन अहिर आदी नेत्यांनी भांडी आणि पकोडे आणले होते. राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या वाढल्याचा दावा दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. ते म्हणाले की, सरकार नोकर्‍यांविषयी विज्ञापन देत असते; मात्र रिक्त जागा भरत नाही.