सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार !
सनातनचे ११ वे संत आणि सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांचा आज मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी (१६.१२.२०२३) या दिवशी ४९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या साधकांना जाणवलेली पू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये आणि साधकाने अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प येथे प्रसिद्ध करत आहोत.
पू. संदीप आळशी यांना ४९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘ पूर्वी एकदा प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) संगणकात एक धारिका वाचत होते. प.पू. डॉक्टरांनी धारिका वाचायला आरंभ केल्याक्षणीच ते म्हणाले, ‘‘संदीपने (सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी) ही धारिका लिहिली आहे का ?’’ त्या वेळी संगणकाच्या पडद्यावर पू. संदीपदादांचे नाव दिसत नव्हते, तरीही प.पू. डॉक्टरांनी ते लिखाण पू. संदीपदादांचे असल्याचे ओळखले.
तेव्हा मी त्यांना कुतुहलापोटी विचारले, ‘‘तुम्ही कसे ओळखले ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘जो चांगली समष्टी साधना करतो, तोच अशा चौकटी लिहू शकतो.’’ पू. संदीपदादा ‘साधकांना साधनेत साहाय्य व्हावे’, या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर चौकटी लिहितात. त्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होतात, तसेच त्यांनी लिहिलेल्या चौकटींवर आधारित ‘सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?’ आणि ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ हे दोन लघुग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
ग्रंथासंदर्भात कोणतीही धारिका प.पू. डॉक्टरांकडे वाचायला आल्यावर ते प्रथम विचारतात, ‘‘ही धारिका संदीपने वाचली आहे का ?’’ संदीपने धारिका वाचल्यावर मी पहातो. त्यांचा याचाच अभ्यास अधिक आहे.’’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधकांना साधनेत साहाय्य करणारे पू. संदीप आळशी !‘पू. संदीप आळशी ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या साधकांचा सत्संग घेतात. ते आवश्यकतेनुसार दुपारी किंवा रात्री साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी येतात. साधकांना येत असलेल्या सेवा आणि साधना यांच्या संदर्भातील अडचणी ते स्वतःहून जाणून घेतात अन् त्यावर उपाययोजना सांगतात. ते साधकाच्या प्रकृतीनुसार त्याच्या स्थितीला येऊन साहाय्य करतात. त्यांनी आम्हाला एखादी सेवा सांगितल्यावर आम्ही त्यांना त्या संदर्भात आढावा देण्याच्या आधीच बर्याच वेळा तेच आमचा आढावा घेतात. याविषयी प.पू. डॉक्टरांना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘संदीप साधकांसाठी किती करतो ना ! एरव्ही साधक सत्संगसेवकाला आढावा देतात आणि त्यानंतर सत्संगसेवक आढावा घेतो; मात्र संदीप स्वतःहून तुमचा आढावा घेतो. आश्रमात स्वतःहून साधकांचा आढावा घेणारे संदीपसारखे कुणी आहे का ?’’ प.पू. डॉक्टर अनेक वेळा म्हणतात, ‘‘मी लिहिलेल्या आणि संकलित केलेल्या विषयांच्या लिखाणाचे पुढे काय होणार ?’, याची मला मुळीच काळजी वाटत नाही. माझ्यानंतर सनातनचे ग्रंथकार्य संदीप बघेल.’’ ‘प.पू. डॉक्टर, असे संतरत्न लाभलेल्या पू. संदीपदादांचा आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे. आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी आपल्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’ – ग्रंथांशी संबंधित सेवा करणारे सर्व साधक (३.१२.२०२३) |
पू. संदीपदादा, सनातनची ‘ग्रंथगंगा’ तुम्ही कार्यरत ठेवली !
परात्पर गुरुदेवांनी
सनातनची ‘ग्रंथगंगा’ (टीप १) पृथ्वीवर अवतीर्ण केली ।
पू. संदीपदादांच्या (टीप २) माध्यमातून ती पुढे कार्यप्रवण झाली ।। १ ।।
या ग्रंथगंगेचा हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोठा वाटा असे ।
खळखळणारी ही गंगाच धर्मकार्य पुढे नेत असे ।। २ ।।
स्थूल-सूक्ष्म देहांच्या व्याधींवर मात पू. संदीपदादांनी केली ।
गुरुआज्ञेने ग्रंथगंगा कार्यरत करण्या जीवन समर्पित केले ।। ३ ।।
भक्ती आणि ज्ञान यांची ही आदर्श मूर्ती असे ।
साधनापथावरील जिवांना लिखाणातून बोध देत असे ।। ४ ।।
रत्न पारख्याने (टीप ३) निवडला असा हा संतमोती (टीप ४)।
साधकांसमोर आदर्श ठेवते त्यांची प्रत्येक कृती ।। ५ ।।
धन्य तो रत्नपारखी, धन्य तो निवडक संतमोती ।
ग्रंथगंगेच्या सेवेतून घेऊन जावे, पैलतिरी ।
हीच प्रार्थना करतो ।
गुरुदेव अन् पू. संदीपदादा यांच्या कोमल चरणी ।। ६ ।।
टीप १ : सनातनचे ग्रंथ
टीप २ : पू. संदीप आळशी
टीप ३ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी
टीप ४ : पू. संदीप आळशी
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२३)