मराठा आरक्षणावरून बीड येथे झालेल्या हिंसाचाराची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) : ३० ऑक्टोबर या दिवशी बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची विशेष पोलीस पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासाठी २ दिवसांत विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले होते. आमदार संदीप क्षीरसागर यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
पोलिसांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. जमावाला प्रारंभीच अडवले असते, तर पुढील दुर्घटना घडली नसती. पोलिसांची संख्या अपुरी होती, तर अन्य जिल्ह्यातून पोलीस साहाय्य घ्यायला हवे होते. ‘हा हिंसाचार नियोजनबद्ध होता’, असा आरोप करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी याविषयी अन्वेषणाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही चौकशी करण्याची मागणी केली.
(सौजन्य : Mumbai Tak)
यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दुर्घटनेच्या ठिकाणी पोलिसांच्या तुलनेत जमावाची संख्या अधिक होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली असती, तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. हिंसाचार वेगवेगळ्या ठिकाणी घडला. यामध्ये काही लोक ३-४ ठिकाणी दिसत आहेत. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये ३० आरोपी सराईत आहेत. अद्यापही माजलगाव येथील ४०, तर बीड येथील ६१ आरोपी सापडलेले नाहीत. अटक झालेल्यांच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाचे ‘मोबाईल लोकेशन’ही पडताळण्यात आले आहे. या दुर्घटनेतील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे ? याचे अन्वेषण होत आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले, तरी आरोपींवर कारवाई केली जाईल.’’