देवेंद्र फडणवीस यांनीही खोटे न बोलता आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ! – मनोज जरांगे पाटील
संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मराठा आरक्षणाचा लढा उभारणार्या मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे यांची बीड येथील अंबाजोगाई येथील सभेत अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांनी १३ डिसेंबर या दिवशी पत्रकारांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणातील आंदोलनात तरुणांवर नोंद झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूत्रावर खोटे न बोलण्याचे आवाहन केले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की,
१. सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमच्याकडे प्रतिनिधी पाठवले होते. या प्रतिनिधींनी आम्हाला गुन्हे मागे घेण्यासंबंधीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या शब्दाला जागून आंतरवाली सराटीत आणि राज्यातील इतर भागांत मराठा आंदोलकांवर नोंद झालेले गुन्हे मागे घ्यावेत.
२. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी खरे बोलून गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा मराठ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. भुजबळांना जातीय तेढ निर्माण करण्याची सवय आहे. सरकार त्यांचे ऐकून अन्याय करणार असेल, तर आम्ही सहन करणार नाही.