सातारा येथे ‘शहर सुधार समिती’चे एक दिवसाचे धरणे आंदोलन !
सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेची अवैध सीमावाढ रहित करावी, सातारा शहर परिसराचा विकास आराखडा स्वतंत्र प्राधिकरणाच्या वतीने करण्यात यावा, या मागणीसाठी ‘सातारा शहर सुधार समिती’ने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी सीमावाढ भागात अनधिकृतरित्या आकारल्या जाणार्या मालमत्ता करास विरोध केला. शाहूनगर, विलासपूर, खेड, शाहूपुरी येथील नागरिकांची बैठक जिल्हाधिकार्यांनी घ्यावी, अशी मागणीही ‘सातारा शहर सुधार समिती’ने केली.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भारतीय राज्यघटना कलम २४३ (क्यू) प्रमाणे नागरी भाग संक्रमण अवस्थेच्या परिसरातील विकास व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, असे घटनात्मक प्रावधान आहे. त्याचे पालन झालेले नाही, तसेच संबंधित सीमावाढीत सातारा शहर परिसराचा समावेश प्रस्ताव कोणत्या विधीमंडळ अधिवेशनात झाला, याची माहिती या भागातील नागरिकांना नाही. ती सार्वजनिक व्हावी. सातारा नगरपालिकेकडून आकारल्या जाणार्या मालमत्ता कर वसुलीस शासनाने तातडीने स्थगिती द्यावी. सातारा शहर परिसर विकास आराखडा स्वतंत्रपणे करून त्यावर कार्यवाही करावी.
संपादकीय भूमिका :असे आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? |