भाजणे (Burns) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती
‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक १९) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत ८ डिसेंबर या दिवशी आपण ‘कीटक किंवा प्राणी यांनी चावणे /दंश करणे (Bites / Stings of insects and animals)’ या आजारावर घ्यावयाची काळजी आणि त्यावर घ्यावयाची औषधे’, यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
शरिराचा कोणताही भाग गरम पाणी किंवा अन्य द्रव पदार्थ, वाफ, प्रखर ऊन यांमुळे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर होणार्या दुष्परिणामाला ‘भाजणे’, असे म्हणतात. आम्लासारख्या रसायनांमुळेही शरीर भाजले जाऊ शकते. किरकोळ भाजल्यास आपण घरच्या स्तरावर उपचार करू शकतो; परंतु मोठ्या प्रमाणात भाजले असल्यास ते घातक ठरू शकते; म्हणून त्यासाठी तत्काळ रुग्णालयात भरती करणे आवश्यक असते. भाजलेला भाग लालसर होणे, त्याला सूज येणे, पाणी असलेले फोड येणे, ही भाजल्याची सर्वसाधारण लक्षणे असतात. भाजलेल्या भागाची योग्य निगा आणि उपचार न झाल्यास तिथे पू निर्माण होऊ शकतो. या लक्षणांच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
१. कॅन्थरिस व्हेसिकाटोरिया (Cantharis Vesicatoria)
१ अ. भाजल्यानंतर होणार्या फोडांमध्ये पाणी धरण्यापूर्वी किंवा पाणी धरल्यानंतर या औषधाचे मूल अर्क पाण्यात मिसळून ते भाजलेल्या त्वचेवर लावावे.
१ आ. फोड फुटल्यानंतर हे औषध उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये घालून ते फोडांवर लावावे.
२. अर्टिका युरेन्स (Urtica Urens) : भाजल्यानंतर आग होऊन वेदना होणे
३. कॉस्टिकम् (Causticum)
३ अ. भाजल्यानंतर व्यक्ती कधीही निरोगी नसणे
३ आ. भाजल्यानंतर त्वचेवर होणारे विविध दुष्परिणाम
४. हेपार सल्फुरिस कॅल्करिया (Hepar Sulphuris Calcarea) : भाजल्यानंतर जखमा चिघळून त्यामध्ये पू होणे
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील. |