नीच आणि दुर्जन मनुष्याविषयी संस्कृत सुभाषिते
संस्कृत भाषेचे सौंदर्य
नीच मनुष्याला आश्रय न देणे
यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः ।
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ॥
अर्थ : ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आपल्याला साहाय्य करणार्याचा सुद्धा नाश करतो.
उदाहरण सांगायचे झाल्यास औरंगजेबाला ज्याने साहाय्य केले, राज्यावर बसवले त्या मिर्झाराजे जयसिंगाला शेवटी औरंगजेबाने विषप्रयोग करून मारले.
नीच मनुष्यावर उपकार न करणे !
उपकारोऽपि नीचानामपकारो हि जायते ।
पयः पानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम् ॥
अर्थ : नीचावर उपकार केला, तरी तो अपकारच करतो. सापाला दूध पाजणे, म्हणजे त्याचे विष वाढवणे होय.
दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणे
दुर्जनः प्रियवादी च नैतद्विश्वासकारणम् ।
मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम् ॥
अर्थ : दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती गोड बोलणारी असली, तरी तिच्यावर विश्वास ठेवू नये; कारण तिच्या जिभेवर मध आणि हृदयात हलाहल विष असते.