मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांचा पर्यटन विकास अन् अर्थव्यवस्थेला बळ !
देश-विदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने मंदिरांचे महत्त्व, तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण यांचा आढावा घेणारा हा लेख…
१. प्राचीन काळापासून मंदिरांचे विविध स्तरांतील महत्त्व !
भारतातील मंदिरे देशातील समृद्ध, धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिंबित करतात. भारतामध्ये २० लाखांहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कार यांची ठिकाणे मानली जातात अन् ती देशातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांना आकर्षित करतात. याचे कारण, म्हणजे आजच्या या आधुनिकतेच्या युगातही हिंदु संस्कृती, चालीरिती आणि धर्म कसे जपायचे अन् ते अंगीकारायचे, हे आपणा भारतियांना ठाऊक आहे. मंदिरे ही प्राचीन काळापासून व्यापार, कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक जीवन यांची केंद्रे राहिली आहेत. स्थानिक मंदिर हे तर समाजाचे केंद्र होते. येथेच लोक आरोग्य, संपत्ती, संतती, विशिष्ट अडथळा दूर करण्यासाठी किंवा मौल्यवान काहीतरी मिळवण्यासाठी देवीदेवतांना भक्तीभावाने प्रार्थना करायचे आणि आजही करतात. येथेच लोक भेटायचे, बातम्या आणि विविध कल्पना यांची देवाण-घेवाण व्हायची. त्यांच्या कथा आणि अडचणी यांवर चर्चा होत असे. एकमेकांना ही मंडळी सल्ला विचारायची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचे नियोजनही करायची.
देशातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी परंपरा आणि या प्रत्येक राज्याचा सांस्कृतिक केंद्रे म्हणून धार्मिक-सामाजिक उत्तरदायित्व निभावणार्या अनेक मंदिरांचा समृद्ध असा इतिहास आहे. ‘रिलिजन’ (पंथ) नाही, तर ‘धर्मा’ने राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागतिक दृष्टीकोनाला आकार दिला आहे आणि त्यांना आध्यात्मिकरित्या प्रगतही होऊ दिले. भारतातही अनेक श्रीमंत मंदिरे आहेत, जी प्रतिवर्षी जगभरातून लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. मंदिरे ही भारतातील अशी आध्यात्मिक स्थळे आहेत, जिथे लोक शांती, समृद्धी आणि आनंद यांसाठी प्रार्थना करतात. यांपैकी बरीच मंदिरे तर स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुना मानली जातात. यांपैकी अनेक मंदिरे प्राचीन काळात बांधली गेली होती आणि अशा या मंदिरांविषयी भरपूर आकर्षक कथा आहेत. यातील काही मंदिरे तर पुष्कळच श्रीमंत आहेत; कारण त्यांच्याकडे मोठ्या किंमतीच्या भूमी किंवा सोने आहे. अनेक मंदिरांमध्ये मौल्यवान वस्तू आणि पुरातन वस्तूंचा संग्रह आहे, जो पिढ्यान्पिढ्या तसाच आहे.
२. मजबूत अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मिती यांमध्ये मंदिरांचे योगदान !
काही मार्गांनी तीर्थक्षेत्र-समृद्ध, तसेच पर्यटन-समृद्ध आर्थिक क्षेत्रांची वाढ व्यापक संशोधनातून सिद्ध झाली आहे; कारण संपूर्ण भारतीय इतिहासात मंदिरे ही महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्रे होती. अमेरिकेतील ‘मिनेसोटा युनिव्हर्सिटी’च्या बर्टन स्टीन यांनी १९६० मध्ये यावर ‘द इकोनॉमिक फंक्शन ऑफ ए मीडिव्हल साऊथ इंडियन टेंपल’ नावाचा एक महत्त्वपूर्ण शोधनिबंधही लिहिला, जो ‘द जर्नल ऑफ एशियन स्टडीज’मध्ये प्रकाशित झाला. ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थे’च्या (‘एन्.एस्.एस्.ओ.’च्या) आकडेवारीनुसार धार्मिक यात्रेला जाणारे ५५ टक्के हिंदु मध्यम आणि लहान आकाराच्या हॉटेलमध्ये रहातात. धार्मिक प्रवासाचा व्यय प्रतिदिन/व्यक्ती २ सहस्र ७१७ रुपये, सामाजिक प्रवासाचा व्यय प्रतिदिन/व्यक्ती १ सहस्र ६८ रुपये आणि शैक्षणिक प्रवासाचा व्यय प्रतिदिन/व्यक्ती २ सहस्र २८६ रुपये आहे.
‘एन्.एस्.एस्.ओ.’च्या सर्वेक्षणानुसार मंदिराची अर्थव्यवस्था ३.०२ लाख कोटी रुपये किंवा अनुमाने ४० अब्ज इतकी आहे आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (‘जीडीपी’च्या) ती २.३२ टक्के आहे. प्रत्यक्षात ती पुष्कळ मोठी असू शकते. फुले, तेल, दिवा, अत्तर, बांगड्या, कुंकू, मूर्ती, चित्र आणि पूजेचे कपडे यांचा समावेशही त्यात होतो. ही कामे बहुतांशी असुरक्षित-अनौपचारिक कामगारांच्या माध्यमातून चालतात. असेही एक अनुमान आहे की, एकट्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाने भारतात ८ कोटी लोकांना रोजगार दिला आहे, ज्याचा वार्षिक वृद्धी दर १९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि केवळ गेल्या वर्षात २३४ अब्ज रुपयांपेक्षा अधिक महसूल यातून प्राप्त झाला आहे. सरकारी अनुमानानुसार भारतातील अनुमाने ८७ टक्के पर्यटक हे देशांतर्गत, तर उर्वरित १३ टक्के विदेशी पर्यटक आहेत. हिंदु आणि बौद्ध धर्मियांसाठी वाराणसीचे धार्मिक महत्त्व कायम आहे. याचा अर्थ असा की, या प्राचीन शहराला एकूण देशांतर्गत पर्यटक आणि यात्रेकरू यांची संख्या मोठी आहे.
वर्ष २०२२-२३ साठी केंद्र सरकारचा महसूल १९ लाख ३४ सहस्र ७०६ कोटी रुपये आहे आणि केवळ ६ मंदिरांनी २४ सहस्र कोटी रुपये रोख जमा केले आहेत. देशांतर्गत धार्मिक पर्यटन विदेशी पाहुण्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
१०० कोटींहून अधिक देशांतर्गत नवीन स्थळांच्या पर्यटनावरून असे दिसून येते की, देहली-आग्रा-जयपूर या सुवर्ण त्रिकोणाच्या पलीकडे मंथन चालू आहे. ९ कोटी विदेशी पर्यटकांपैकी २० टक्के पर्यटक तमिळनाडूतील मदुराई आणि महाबलीपुरम् येथे, तर आंध्रप्रदेशातील तिरुपतीला भेट देतात. गेल्या काही वर्षांमध्ये ‘जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ (डब्ल्यू.ई.एफ्.) आणि ‘यु.एन्.डब्ल्यू.टी.ओ.’ (संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था) पर्यटन निर्देशांक यांसारख्या प्रमुख जागतिक निर्देशांकांवर भारताच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. पर्यटन क्रियाकलापांमध्ये वाढ होण्यामुळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स यांसारख्या बहुवापराच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात साहाय्य होते. परिणामी भारत सरकारचा पुढील काही वर्षांत १०० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा (८ सहस्र २०० अब्ज रुपयांहून) अधिक किमतीचा परकीय चलन आकर्षित करण्याचा मानस आहे. त्यामुळे अनुमाने १०० लाख नोकर्या उपलब्ध होतील.
३. देशाच्या हानीचे मूळ कारण मंदिरांची राजकीय उपेक्षा !
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्यटनविषयक एका कार्यक्रमामध्ये बोलत होते, तेव्हा त्यांनी रामायणासह सर्व संतांच्या तीर्थक्षेत्रांचा आवर्जून उल्लेख करून त्यावर एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व सांगितले. ‘काही लोकांना असे वाटते की, ‘पर्यटन’ हा उच्च उत्पन्न गटांसाठी एक भन्नाट शब्द आहे; परंतु तो शतकानुशतके भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक भाग राहिला आहे’, असे पंतप्रधान म्हणाले. या वेळी त्यांनी शतकानुशतके जनतेने केलेल्या विविध प्रवासांचा संदर्भ देत ‘चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग यात्रा आणि ५१ शक्तिपीठ यात्रा यांची उदाहरणे राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी, तसेच हिंदु श्रद्धास्थाने जोडण्यासाठी कशी वापरली जातात’, हे दाखवून दिले. देशातील अनेक प्रमुख शहरांची संपूर्ण अर्थव्यवस्था या यात्रांवर अवलंबून असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी यात्रेची जुनी परंपरा असूनही सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अगोदरच्या सरकारांकडून विकास झाला नसल्याविषयी अप्रसन्नताही व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘देशाच्या हानीचे मूळ कारण स्वातंत्र्यानंतरच्या दशकांतील शेकडो वर्षांची गुलामगिरी आणि या मंदिरांची राजकीय उपेक्षा, हे आहे. आजचा भारत ही परिस्थिती पालटत आहे, तसेच सुविधा वाढल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढते. वाराणसीतील काशीविश्वनाथ धामला नूतनीकरणाच्या पूर्वी एका वर्षात अनुमाने ८० लाख लोकांनी भेट दिली होती; परंतु गेल्या वर्षी पर्यटकांची संख्या ७ कोटींहून अधिक झाली आहे. पर्यटकांची संख्या आणि अधिक पर्यटक, म्हणजे रोजगार अन् स्वयंरोजगार यांच्या अधिक संधी !’’
४. देश आणि समाज यांच्या संकटकाळात मंदिरांकडूनच संघटन !
हिंदु मंदिरांना बहुआयामी महत्त्व आहे, ज्यात बौद्ध, जैन आणि शीख मंदिरांचाही समावेश आहे. साम्यवादी आणि धर्मांतर माफियांकडून हिंदु मंदिरे अन् धार्मिक प्रथा यांचा सतत निषेध आणि थट्टा केली जाते. जेव्हा समाज आणि देशाला सर्वाधिक आवश्यकता होती, तेव्हा मंदिरांनी लोकांना एकत्र आणले. आजही मंदिरांच्या वतीने नियमितपणे आणि आपत्कालीन परिस्थितीत राबवले जाणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. अलीकडेच कोरोना महामारीची मोठी आपत्ती आली. त्या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांनी केलेल्या साहाय्यामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळाला, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. शाळा, रुग्णालये आणि ग्रामविकास उपक्रम यांसाठी मोठ्या मंदिरांचे काम कौतुकास्पद आहे. सध्याच्या सरकारने मंदिर स्थळांचे, तसेच संबंधित पायाभूत सुविधांचे पद्धतशीर नियोजन आणि विकास करून गुलामगिरीची मानसिकता तोडणे, सांस्कृतिक बंधने जोडणे, सामाजिक-आर्थिक अन् आध्यात्मिक विकास यांवर लक्ष केंद्रित करणे, अधिक सामाजिक एकता आणि शांतता शोधण्यासाठी जीवन साजरे करणे, समाज अन् देश यांविरुद्ध रचलेल्या षड्यंत्राविरुद्ध एकसंघ म्हणून लढणे या सर्वांचा पाया घातला आहे, जो सर्वार्थाने कौतुकास्पद म्हणावा लागेल.
५. मंदिरांचे वैज्ञानिक महत्त्व !
चुंबकीय आणि विद्युत् लहरी पृथ्वीच्या आत सतत फिरत असतात. जेव्हा वास्तुविशारद आणि अभियंते मंदिराची रचना करतात, तेव्हा ते भूमीचा एक तुकडा निवडतात, जिथे या लहरी भरपूर असतात. मुख्य मूर्ती मंदिराच्या मध्यभागी असते, ज्याला ‘गर्भगृह’ किंवा ‘मूलस्थान’, असेही म्हणतात. मंदिर बांधले जाते आणि ‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणून ओळखल्या जाणार्या पूजेने मूर्तीला अभिषेक केला जातो. चुंबकीय लहरी अत्यंत सक्रीय असलेल्या ठिकाणी मूर्ती ठेवली जाते. मूर्ती ठेवतांना त्याखाली काही ताम्रपट पुरतात. या पटांवर वैदिक लिपी कोरलेल्या असतात. या तांब्याच्या पट्ट्या पृथ्वीवरील चुंबकीय लहरी शोषून घेतात आणि त्या आजूबाजूच्या भागात पसरतात. परिणामी जर एखादी व्यक्ती नियमितपणे मंदिराला भेट देत असेल आणि मूर्तीभोवती घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत असेल, तर त्याचे शरीर या चुंबकीय लहरी शोषून घेते अन् त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे ती निरोगी जीवन जगते.
जवळजवळ सर्व हिंदु मंदिरांमध्ये मोठ्या घंटा असतात की, ज्या प्रवेश करण्यापूर्वी वाजवल्या पाहिजेत. त्यामागील विज्ञानही आश्चर्यकारक आहे. मंदिरातील घंटा वेगवेगळ्या धातूंनी अगदी विशिष्ट प्रमाणात बनवल्या जातात. यामध्ये कॅडमियम, शिसे, तांबे, जस्त, निकेल, क्रोमियम आणि मँगनीज यांचा समावेश होतो. घंटा वाजवण्याच्या विज्ञानामागचे खरे कारण, म्हणजे उत्पादनात वापरल्या जाणार्या धातूंचे मिश्रण आणि प्रमाण ज्यामुळे घंटा वाजवली की, वेगळा नाद निर्माण होतो अन् त्यातून निर्माण होणारे कंपन इतके वेगळे आणि विशिष्ट असतात की, ते मेंदूंच्या दोन्ही बाजूंना (डावी आणि उजवी बाजू) जोडतात. या व्यतिरिक्त मोठा आवाज आणि कंपन अनुनाद मोडमध्ये ७ सेकंद टिकते, जे शरिराच्या ७ उपचार केंद्रांना स्पर्श करण्यासाठी पुरेसे आहे. आवाजाने मन सर्व विचारांपासून रिकामे होते. ते पुष्कळ ग्रहणक्षम बनते, नवीन कल्पना स्वीकारण्यास सज्ज होते आणि मनाला चालू असलेल्या सर्व गोंधळापासून मुक्त करते. इतर अनेक लाभांमध्ये नकारात्मक विचारांचे उच्चाटन, एकाग्रता सुधारणे, मानसिक संतुलन आणि आजारपणात साहाय्य यांचा समावेश होतो.
६. मंदिरांच्या अर्थव्यवस्थेविषयी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यकता !
मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि विविध क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्माण करील.
अ. यातील एक महत्त्वपूर्ण भाग पद्धतशीर व्यवस्थापनाद्वारे मजबूत केला पाहिजे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मंदिर, त्याचे व्यवस्थापन आणि त्याची अर्थव्यवस्था यांचा समावेश करणे, हा सूज्ञ दृष्टीकोन असेल.
आ. तरुण त्यांचे प्रयत्न आणि संसाधने मंदिराच्या अर्थव्यवस्थेच्या अन् संबंधित पर्यटन क्षेत्रांचा विस्तार आणि विकासासाठी निर्देशित करू शकतात.
इ. दुसरे म्हणजे सर्व प्रमुख हिंदु मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढणे. ‘कोणताही राजकीय नेता मंदिर व्यवस्थापन समितीचा भाग नसावा’, असा नवा कायदा सरकारने करावा.
ई. मंदिरातील देणगीचा वापर त्या विशिष्ट धर्माच्या कल्याणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी केला पाहिजे. तो दुसर्या धर्माच्या चुकीच्या चालीरिती आणि कार्य यांसाठी वापरता कामा नये.
त्यामुळे आपण सर्व हिंदूंनी मंदिर संस्कृती आणि तिच्या क्रियाकलापांना योग्य दृष्टीतून पाहू अन् मंदिराची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी एकत्र काम करूया.
– पंकज जयस्वाल
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)