श्री अष्टविनायक दर्शनासाठी जाता न आल्याने त्यांची मानसपूजा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती
१. स्थुलातून श्री अष्टविनायक दर्शनासाठी जाता न आल्याने मानसपूजा करण्याचे ठरवणे
‘वर्ष २०२१ मध्ये श्री गणेशचतुर्थीनिमित्त मी श्री अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचे ठरवले होते; परंतु काही कारणास्तव दर्शनासाठी जाणे मला रहित करावे लागले. तेव्हा मला थोडे वाईट वाटले. त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘स्थुलातून देवाचे दर्शन घेण्याला मर्यादा आहे. प्रतिदिन अष्टविनायकांची भावपूर्ण मानसपूजा करूया.’ मी मानसपूजा करतांना षोडशोपचार पूजा करणे चालू केले.
२. श्री गणेश आणि प.पू. गुरुदेव यांना प्रार्थना करून मानसपूजा करणे आणि ‘गुरुदेव मानसपूजा करून घेत आहेत’, असे जाणवणे
यापूर्वी मला ‘मानसपूजा करायला जमणार नाही’, असे वाटून मी मानसपूजा करत नव्हतो. या वेळी मी श्री गणेश आणि प.पू. गुरुदेव यांना ‘तुम्हीच माझ्याकडून पूजा करून घ्या’, अशी प्रार्थना करून पूजा करायला आरंभ केला. आरंभी मला मानसपूजा करतांना फार त्रास होत असे. माझी एकाग्रता साधली जात नसे; पण या वेळी पूजा चालू झाल्यावर माझा त्रास उणावला आणि ‘गुरुदेव माझ्याकडून मानसपूजा करून घेत आहेत’, असे वाटत होते.
३. मानसपूजा करतांना ‘हृदयातून शक्तीचा गोळा बाहेर पडत असून तो गोळाही मानसपूजा करत आहे’, असे जाणवणे
मानसपूजा करतांना ‘माझ्या हृदयातून एक शक्ती बाहेर येत आहे’, असे मला जाणवत असे. ‘ही शक्ती म्हणजे काय ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ‘हा शक्तीचा गोळा माझ्या बाजूला थांबून तोही मानसपूजा करत आहे’, असे मला जाणवत असे. असे बराच वेळ चालू असे. तेव्हा मला ‘हे काय आहे ?’, असा प्रश्न पडत होता.
४. गुरुदेवांच्या कृपेने मनात ‘शिव आणि शक्ती एकच असतात’, असा विचार येणे
त्यानंतर गुरुदेवांनी विचार दिला, ‘शिव आणि शक्ती एकच असतात.’ ‘शिवाचे अर्धनारी नटेश्वर रूप शिव-शक्ती एकत्रित असल्याचे प्रतीक आहे’, असे मला जाणवले. त्याप्रमाणे हे प्रकृतीचे रूप आहे. प्रकृती आणि पुरुष एकत्रच असतात. यातून मला शिकायला मिळाले, ‘आत्म्यामध्ये स्त्री-पुरुष असा भेद नसतो. तो सर्वसमावेशक आहे. आपण जे ‘अहं ब्रह्मास्मि ।’ (मी ब्रह्म आहे) किंवा ‘शिवोऽहं’ (मी शिव आहे.) म्हणतो, ते प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही लागू होते.
मला जो स्त्री-पुरुष असा भेद जाणवत होता, त्याची तीव्रता ही अनुभूती आल्यानंतर न्यून झाली.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला हे अनुभवता आले आणि ज्ञान मिळाले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. सुमित भागवत सरोदे, फोंडा, गोवा. (५.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |