अटकेतील आरोपींना संसदेची गोळा केली होती माहिती !
संसदेतील घुसखोरीचे प्रकरण
नवी देहली – संसदेत घुसखोरी करून धूर सोडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी संसदेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. हे सर्व आरोपी दीड वर्षांपूर्वी कर्नाटकातील म्हैसुरू येथे भेटले होते. मनोरंजन गौडा हा म्हैसुरू येथे रहाणारा आहे. हे सर्व आरोपी ‘भगतसिंह फॅन क्लब’ या सामाजिक माध्यमांवरील गटाशी संबंधित आहेत. यातील सागर शर्मा याच्या लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील घरी पोलिसांना भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या संदर्भातील पुस्तके सापडली आहेत, तसेच मनोरंजन गौडा हा माओवाद्यांशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यासह नीलम हिचा भाजपविरोधी आंदोलनात नेहमीच सहभाग असल्याची माहितीही समोर आली आहे.
सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड
कसा रचला कट ?
यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी मनोरंजन देहलीत आला होता. त्याने पास घेऊन संसदेत प्रवेश केला. तेथे त्यांनी संसदेची संपूर्ण माहिती गोळा केली. त्याला समजले की, संसदेत प्रवेश करतांना बूट तपासले जात नाहीत. जुलै महिन्यात सागर शर्मा देहलीत आला; मात्र त्याला संसद भवनात जाता आले नव्हते. त्याने संसदेची बाहेरूनच माहिती गोळा केली होती.
घुसखोरीसाठी अमोल शिंदे महाराष्ट्रातून ‘कलर स्कोम ट्यूब’ घेऊन आला. संसदेत घुसखोरी करण्यापूर्वी सर्व आरोपी सकाळी इंडिया गेटजवळ एकत्र आले होते. तेथे त्यांना कलर स्मोक ट्यूब वाटण्यात आल्या. त्यांच्या समवेत ललित झा हाही होता. त्याने नीलम, अमोल, मनोरंजन आणि सागर शर्मा यांचे भ्रमणभाष स्वतःकडे घेतले होते. घटनेच्या वेळी तो संसद परिसरात उपस्थित होता. त्यानंतर तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या सर्व आरोपींच्या मागे अन्य कुणीतरी मुख्य सूत्रधार आहे, असा पोलिसांचा तर्क आहे. या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याची पत्नी वृंदा यांनाही अटक करण्यात आली आहे. विक्की आणि सागर हे दोघे नातेवाईक आहेत.
लोकसभेत विरोधी पक्षांकडून गदारोळ !
लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर १४ डिसेंबर या दिवशी लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन न आल्यामुळे विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे प्रथम २० मिनिटे आणि नंतर दुपारी २ पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. गदारोळाच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत विरोधकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, काल जो प्रकार घडला, त्याचा सगळ्यांनीच निषेध केला आहे. ही फार दुर्दैवी घटना आहे, यात कोणतेही दुमत नाही. अध्यक्षांनीही त्याची नोंद घेऊन तातडीने चौकशीचेाआदेश दिला आहे. मला वाटते की, भविष्यात सत्ताधारी वा विरोधी पक्षाच्या सर्वच खासदारांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या कुणाला प्रवेशासाठी पास देत आहोत, त्यात अशा कुठल्या व्यक्तीला पास दिला जाऊ नये जी असे कृत्य संसदेत करेल. आपण सगळ्यांनीच ही काळजी घेणे आवश्यक आहे.
८ सुरक्षा कर्मचारी निलंबित !
लोकसभेत आणि संसद परिसरात घुसून रंगीत धूर सोडल्याच्या प्रकरणात निष्काळजीपणा केल्यावरून संसद सचिवालयाने ८ सुरक्षा कर्मचार्यांना निलंबित केले आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी आक्रमणाच्या संदर्भात संसदेत केंद्रीय मंत्र्यांसमवेत बैठक घेतली.
संपादकीय भूमिकाआरोपी अशा प्रकारचा कट रचत असतांना गुप्तचर यंत्रणांना याची माहिती कशी मिळाली नाही ? उद्या जिहादी आतंकवादी संसदेवर आक्रमण करण्याचा कट रचत असतील, तर त्यांची माहिती गुप्तचरांना मिळेल का ? |