हिंदु नेत्याच्या हत्येचा कट रचणे, हे आतंकवादी कृत्य नाही ! – मद्रास उच्च न्यायालय
चेन्नई – आसिफ मुस्तहिन नावाच्या आरोपीने हिंदु नेत्याची हत्या करण्याचा कट रचला होता; मात्र ते आतंकवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एस्. सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपिठाने नमूद केले. १३ डिसेंबर या दिवशी आसिफला जामीन संमत करण्याविषयीच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी हिंदु धर्मगुरूंच्या ‘लक्ष्यित हिंसा’ प्रकरणाला ‘आतंकवादी घटना’ मानण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला, तसेच ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सामील होऊ इच्छिणार्या आसिफला जामीन संमत केला.
आसिफवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित हिंदु धर्मगुरूंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न होते; परंतु हे सर्व असूनही उच्च न्यायालयाने म्हटले की, अधिकार्यांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून ‘आसिफला हिंदु नेत्याची हत्या करायची होती’ हे स्पष्ट होते; परंतु ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्या’च्या कलम १५ नुसार हे आतंकवादी कृत्य कसे मानले जावे ?, हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा स्पष्ट करू शकली नाही. आरोपी आसिफला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने २६ जुलै २०२२ या दिवशी ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्या’च्या अंतर्गत अटक केली होती.