‘महादेव ॲप’चे धागेदोरे दाऊदपर्यंत पोचल्याची गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती !

२ मासांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन !नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – ‘महादेव ॲप’मधील पैसा एका बांधकाम व्यावसायिकाकडे गुंतवला गेला आहे. दाऊदशी संबंधित लोकांसमवेत या बिल्डरची भागीदारी दिसून आली आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘महादेव ॲप’द्वारे जमा करण्यात आलेला पैसा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरण्यात आला आहे का ? याची चौकशी करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे याची चौकशी करण्याची मागणी या वेळी आशिष शेलार यांनी केली.

देवेंद्र फडणवीस

सद्यस्थितीत अंमलबजावणी संचालनालयाकडून याची चौकशी चालू आहे. त्यामुळे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्याची आवश्यकता नसल्याचे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महादेव ॲप’ हे ऑनलाईन जुगाराचे प्रकरण आहे. विविध ६७ संकेतस्थळे या जुगारासाठी वापरण्यात आली. त्यांच्या मालकांशी महादेव ॲपकडून ८०:२० अशी भागीदारी करण्यात आली होती. दुबई येथून हा जुगार नियंत्रित करण्यात येत होता. छत्तीसगड राज्यात ‘महादेव ॲप’द्वारे होणारी फसवणूक उघड झाली. त्यानंतर विविध राज्यांत या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली गेल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यामध्ये कायद्याचे उल्लंघन झाले आहे का ? आर्थिक अपहार झाला आहे का ? याविषयी अन्वेषण करून २ मासांत कारवाई करण्यात येईल.’’