Honey Trap : भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या तरुणाला अटक !

मुंबई – भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानातील गुप्तेहर संघटनेला पुरवल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने २३ वर्षीय गौरव पाटील याला नवी मुंबईतील त्याच्या घरातून अटक केली आहे. तो ‘हनी ट्रॅप’मध्ये (महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवण्याचा प्रकार) अडकला होता. त्याला न्यायालयाने एक आठवड्याची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१. गौरव पाटील नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत आहे. तो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांद्वारे पाकिस्तानमधील गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होता.

२. फेसबुकवरील मुक्ता माहतो, पायल एंजल आणि आरती शर्मा या नावांशी संबंधित खाती असलेल्यांच्या तो संपर्कात होता. ही तिन्ही खाती पाकिस्तानमधून चालवली जात होती.

३. पथकाने या प्रकरणी एकूण ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अन्य तिघे गौरव पाटील याच्या संपर्कात होते.

४. गौरवने अज्ञातांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जहाजांशी संबंधित काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठवली होती. या फेसबुकवरील प्रोफाईलशी तो संपर्कात होता.

५. गौरवला या माहितीच्या बदल्यात पैसे पाठवण्यात येत होते. हा प्रकार एप्रिल-मे आणि ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला.

६. गौरव पाटील याला पाकिस्तानकडून किती रक्कम मिळाली आहे, याचा शोध घेतला जात आहे.

 (सौजन्य : GalliNews)

संपादकीय भूमिका

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून देशाची गोपनीय माहिती शत्रूदेशाला देणार्‍या अशांना फासावर लटकवा !