‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाला काळ्या सूचीमध्ये टाकता येत नाही – उदय सामंत, उद्योगमंत्री
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – ‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाची निविदा कोणत्या कारणांनी रहित करण्यात आली, त्याचे नियम पाहू. त्याच्या आधारे त्या आस्थापनाला ‘ब्लॅक लिस्ट’ (काळ्या सूचीत) करण्यासाठीचे प्रयत्न करू; परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्या आस्थापनाला काळ्या सूचीत टाकता येत नाही, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मुंबईतील रस्त्यांची कामांचा कार्यारंभ आदेश मिळूनही कामाचा प्रारंभ न करणार्या कंत्राटाविरोधात कारवाई करण्याविषयीचा तारांकित प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी १३ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला होता.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “मुंबई शहरातील ३९७ किलोमीटरचे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ आस्थापनांना कार्यादेश दिला होता; परंतु त्यातील ‘मे. रोडवेज इंडिया इंफ्रा लि.’ या आस्थापनाने कामाला प्रारंभ केला नाही. म्हणून त्यांनी भरलेली निविदा सुरक्षा रक्कम, अनामत रक्कम जप्त केली आहे. केवळ कामाला प्रारंभ करून पुढील काम केले नाही म्हणून दंडापोटी ५४ कोटी १५ लाख दंड रकमेच्या वसुलीची कारवाईची चालू आहे.”