पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठलाच्या प्रसादाचे लाडू निकृष्ट !
|
नागपूर – पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा लाडवाचा प्रसाद हा निकृष्ट असल्याचा अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल आणि त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून लाडवाच्या प्रसादाविषयीची सत्यता समोर आली आहे. या अहवालामुळे श्री विठ्ठल मंदिर समितीच्या ढिसाळ कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
१. अहवालामध्ये लाडू सिद्ध करण्याच्या संदर्भात गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. लाडू सिद्ध करण्याचे काम बचत गटाला देण्यात आले होते. बचत गटाकडून लाडू सिद्ध केले जात होते ती जागा अस्वच्छ आहे, तसेच लाडू सुकवण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या मंदिर समिती स्वत: लाडवाचा प्रसाद सिद्ध करून तो विकत आहे.
२. लाडू सिद्ध करण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट कंत्राटामध्ये असूनही सरकीचे तेल वापरले जाते. ३ लाडवांचे पाकीट २० रुपयांना विकले जाते. या लाडवांच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो. यातून होणार्या परिणामास लाडू सिद्ध करणार्या बचत गटासमवेतच मंदिर समितीही तितकीच उत्तरदायी असेल, अशी चेतावणी लेखापरीक्षण करणार्या ‘बी.एस्.जी. अँड असोसिएट्स’ने दिली आहे.
३. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून प्रमाणित करून घेत आहोत. त्यामुळे आताच्या त्रुटी टळतील, असे असे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाविठ्ठलाचा प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू मंदिर समितीने यापूर्वीच प्रमाणित का करून घेतले नाहीत ? हे आहे मंदिर सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे व्यवस्थापन ! मंदिरे भक्तांच्या कह्यात असतील, तरच त्यांना प्रसादाचे महत्त्व लक्षात येणार आणि भक्त प्रसादाचे नियोजन भावपूर्णरित्या करणार ! हिंदूंनो, सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या कह्यात येण्यासाठी प्रयत्न करा ! |