सेवेची तीव्र तळमळ, गुर्वाज्ञापालन आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. यशवंत कणगलेकर (वय ७५ वर्षे) !
‘श्री. कणगलेकरकाका हे आमच्या कुटुंबातील वडीलधार्या व्यक्तींप्रमाणेच आहेत. ते आम्हाला ‘साधना करतांना योग्य विचार कसा करायचा ? सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित काय आहे ?’, हे सहजतेने समजावून सांगतात. काकांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केल्यापासून संस्थेचे कार्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण यांचा अभ्यास केला आहे. ते अत्यंत साधे, नम्र आणि प्रसिद्धीपराङ्मुख आहेत. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १४.१२.२०२३ या दिवशी शांती विधी आहे. त्यानिमित्त त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
१. सातत्य
आम्ही पुणे येथे रहात असतांना श्री. कणगलेकरकाका विज्ञापनांच्या सेवेसाठी पुण्याला येत असत. त्या वेळी ते आमच्या घरी निवासाला असायचे. तेव्हा ते प्रतिदिन पहाटे उठून नामजप करायचे आणि नंतर ते संपर्काला जाण्यासाठी विविध विषयांची सिद्धता करायचे.
२. इतरांचा विचार करणे
काकांना पहाटे उठल्यावर चहा हवा असायचा. त्यासाठी मला पहाटे उठावे लागू नये; म्हणून त्यांनी मला स्वयंपाकघरातील चहासाठी लागणार्या सर्व वस्तू आधीच समजून घेतल्या. ते स्वतःच पहाटे उठून चहा करायचे. चहा करतांना भांड्यांचा आवाज होणार नाही, याची ते काळजी घ्यायचे आणि चहा झाल्यावर सर्व आवरून ठेवायचे.
३. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे
मागील अनेक वर्षे काका भारतातील विविध राज्यांमध्ये सेवेनिमित्त जात होते; मात्र आता मागील काही वर्ष ते शारीरिक त्रास आणि वार्धक्य यांमुळे प्रसारात जाऊन सेवा करू शकत नाहीत. त्यांनी ही परिस्थिती ‘गुरूंची इच्छा’, असे म्हणून सहजतेने स्वीकारली. त्यांनी दिवसभराच्या आपल्या वेळांचे नियोजन केले आणि आता ते उपलब्ध वेळेमध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. ते संत आणि दैवी बालके यांच्या पत्रिका अन् आपत्काळाच्या दृष्टीने भारतातील विविध परिस्थितीचा अभ्यास करत असतात. त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करणे चालू केले. त्यांना या सेवेतही पुष्कळ आनंद मिळतो. ते म्हणतात, ‘‘आपण वर्तमानकाळात राहून गुरुसेवा करत रहायची. अन्य सर्व गोष्टी गुरुदेव बघून घेतील.’
४. घरामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
काका काही वर्षे बेळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी रहात होते. आम्ही पुणे ते गोवा असा प्रवास करत असतांना बहुतेक वेळा त्यांच्या घरी बेळगाव येथे जात असू. त्या वेळी त्यांच्या घरी गेल्यावर ‘मी (सौ. मानसी राजंदेकर) माझ्याच घरी आले आहे’, असे वाटायचे. त्या वेळी घरी काका आणि त्यांचा मुलगा डॉ. अंजेशदादा हे दोघेच असायचे, तरीही त्यांचे घर नीटनेटके असायचे. तेव्हा मला ‘आपण आश्रमातच आलो आहोत’, असेच जाणवत असे. त्यांच्या घरात मला एक प्रकारचा गारवा आणि शांतता अनुभवता येत असे. त्यांच्या घरात मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवायचे.
५. काकांचा स्वतःच्या निवासस्थानाप्रती असलेला भाव
स्वतःच्या घराविषयी बोलतांना काकांनी सांगितले, ‘‘हे घर गुरुदेवांचेच आहे. सर्वकाही त्यांनीच दिले आहे. त्यामुळे आपण येथे आनंदाने राहू शकतो.’’ पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर प्रसाराला जातांना ते बेळगाव येथे काकांच्या निवासस्थानी यायचे. काकांच्या अंगणातील विविध फुलांची झाडे दाखवून त्या संदर्भातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या काही आठवणी काकांनी आम्हाला सांगितल्या.
६. गुरुसेवेची तळमळ
काकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य समाजात पोचवण्याची तळमळ आहे. ते संपर्काला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीचा परिपूर्ण अभ्यास करायचे आणि ते संपर्क करून आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे अन् सेवेतील लक्षात आलेल्या चुका यांचे चिंतन करून ती सर्व सूत्रे लिहून ठेवत असत. ते आम्हाला त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे मोकळेपणाने सांगत असत. त्यांचा सत्संग म्हणजे आम्हाला अभूतपूर्व पर्वणीच असायची.
७. सनातनच्या ग्रंथांप्रती भाव
अ. काकांचा सनातन संस्थेच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास आहे. ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कोणत्या ग्रंथात अध्यात्मातील कोणते सूत्र किंवा तत्त्व लिहिले आहे’, हे लगेच सांगतात. ते ग्रंथात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे स्वतः कृती करण्याचाही प्रयत्न करतात.
आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केलेले ग्रंथ समाजातील लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, यासाठी तळमळीने प्रयत्न करतात.
इ. ते नेहमी म्हणतात, ‘‘साधकाला साधनेत कोणतीही अडचण आली, तरी त्याने सनातनच्या ग्रंथांचे वाचन केले आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या शिकवणीचे चिंतन केले, तर त्याची अडचण आपोआपच सुटेल.’’
ई. काका एखाद्या ग्रंथातील सूत्र सांगतांना इतके मनापासून सांगतात की, ते सूत्र ऐकणार्या साधकाच्या अंतर्मनापर्यंत पोचते आणि त्याच्या साधनेला आपोआपच दिशा मिळते.
उ. ‘सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान हे प्रत्येक जिवाचा उद्धार करू शकते’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती भाव
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात काका नेहमी म्हणतात, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या साक्षात् श्रीविष्णूच्या शक्तीच आहेत.’’ हे सांगतांना काकांचा नेहमी भाव जागृत होतो. अशा अनेक प्रसंगांतून काकांचा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रतीचा भाव अनुभवायला मिळतो.
९. गुर्वाज्ञापालन
मागील २ वर्षे काका रामनाथी आश्रमात पूर्णवेळ निवासाला आहेत. श्री गुरूंनी त्यांना रामनाथी आश्रमात रहाण्यास सांगितले. तेव्हा ‘श्री गुरूंचे आज्ञापालन करणे’, याच उद्देशाने काका आश्रमात रहायला आले. बेळगाव येथील त्यांच्या घराविषयी सांगतांना काका म्हणतात, ‘‘मी केवळ आज्ञापालन केले; पण हे सर्व गुरुदेवांनीच करवून घेतले, अन्यथा मायेतील गोष्टींचा त्याग करणे एवढे सोपे नाही.’’
त्यानंतर त्यांनी कधीच ‘आश्रमात रहाण्याविषयी काही अडचण आहे’, असे गार्हाणे केले नाही. आता वयोमानानुसार त्यांना काही शारीरिक त्रास होत असतात, तरीही त्यांचे कोणतेही गार्हाणे नसते किंवा कुणाकडूनच अपेक्षा नसते. ‘श्री गुरूंनी आपल्याला आश्रमात रहायला सांगून आपल्यावर किती कृपा केली आहे !’ असे ते म्हणतात आणि नेहमी कृतज्ञताभावात रहातात.
१०. आधार वाटणे
अ. श्री. कणगलेकरकाका यांनी आम्हाला (मला आणि श्री. अनिरुद्ध यांना) आम्ही साधना करू लागल्यापासून साधनेत आणि आमच्या जीवनात पुष्कळ साहाय्य केले आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलांप्रमाणेच साधनेत दिशादर्शन केले आहे. त्यामुळे आम्हाला नेहमीच त्यांचा आधार वाटतो, तसेच कधी आमचे काही चुकले, तर ते आम्हाला स्पष्टपणे सांगतात.
आ. कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे) आणि पू. वामन यांनाही काकांचा सत्संग मिळत आहे. काका कु. श्रियाला ‘ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा ?’, हे सोपे करून सांगतात. कु. श्रियाला साधनेविषयी लहान-लहान प्रश्न विचारून तिचे चिंतन करवून घेतात. ‘तिला आश्रमात सेवा करतांना काय काय शिकायला मिळाले ?’, हे ते जाणून घेतात. त्याचप्रमाणे पू. वामन यांनाही ते ब्रह्मांड आणि त्यातील विविध ग्रह यांच्याविषयी माहिती सांगतात. त्यामुळे आमच्या दोन्ही मुलांना कणगलेकरआजोबा प्रिय आहेत.
श्री. कणगलेकरकाका यांच्याकडून शिकण्यासारखे आणि त्यांच्यातील विविध गुणांविषयी लिहिण्यासारखे पुष्कळ आहे. आम्हाला गुरुदेवांच्या कृपेनेच साधनेत आल्यापासून काकांचा सहवास लाभत आहे, यासाठी आम्ही परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. मानसी राजंदेकर आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर (दोघांचीही आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा. (२७.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |