सांगली बसस्थानक परिसरात गाड्या लावण्यासाठी जागा मिळणार !
‘भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ट’च्या आंदोलनास यश !
सांगली – सांगलीतून बाहेरगावी जाणारे किंवा येणारे प्रवासी, नातेवाईक, तसेच सर्वसामान्य यांच्यासाठी दुचाकींच्या वाहनतळासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीने १२ डिसेंबर या दिवशी एस्.टी.च्या विभागीय कार्यासमोर श्री. गोवर्धन हसबनीस यांच्या पुढाकाराने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कार्यशाळा अधिकारी औंधकर आणि दळवी यांनी २ दिवसांत ही जागा खुली करून प्रवाशांना वाहने लावण्यासाठी जागा करून दिली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी ‘भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनास यश आले आहे.
आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.
२. येथील प्रवाशांना सोडण्यासाठी येणार्यांना तात्पुरते वाहन लावण्यासाठी जागा नसल्याने ‘पे पार्किंग’मध्ये वाहने लावून एक घंट्याचे भाडे द्यावे लागत होते, तसेच अन्यत्र गाडी लावल्यास ती वाहतूक शाखेकडून जप्त केली जात होती.
३. या संदर्भात ८ नोव्हेंबरला निवेदन देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे. आंदोलन चालू केल्यानंतर एस्.टी. अधिकार्यांनी नोंद घेत २ दिवसांत जागा खुली करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्टचे प्रदेश सहसंयोजक श्री. ओंकार शुक्ल, श्री. श्रीपाद भट, श्री. संतोष कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनात सर्वश्री अशोक जोशी, प्रसाद विभूते, सुनील ढोबळे, सुखदेव मोकाशी, दर्शन मोकाशी, शुभम पत्की सहभागी झाले होते.