‘हिंदुत्व वॉच’ संकेतस्थळ : भारताच्या विरोधातील नव्या युद्धाचा प्रारंभ !
हिंदुविरोधकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’सारखे प्रकल्प राबवणे काळाची आवश्यकता !
पूर्वीचा काळ हा शत्रूशी रणांगणात युद्ध करण्याचा होता, काळ पालटला तसा युद्धाची शस्त्रे आणि पद्धत पालटली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक काळात तंत्रज्ञान आधारित युद्धांचे जाळे पसरत जाईल. त्यातीलच म्हणता येईल, असे ‘हिंदुत्व वॉच’ हे संकेतस्थळ ! हे संकेतस्थळ हिंदूंनी कट्टर मुसलमानांच्या विरोधात केलेले कथित ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) दाखवते. ही द्वेषपूर्ण भाषणे एकतर्फी दाखवली जातात. एकूण रंग बघता भारतविरोधी मत सिद्ध करून समाज आणि पर्यायाने देश तोडण्याचा हा प्रयत्न आहे. यातून भारतीय समाजात विविध प्रकारची अस्थिरता माजवण्याचा उद्देश यामागे आहे, हे लक्षात येते.
१. ‘हिंदुत्व वॉच’कडून केवळ हिंदूंनी मुसलमानांच्या विरोधात केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांचे संकलन
सप्टेंबर २०२३ मध्ये ‘हिंदुत्व वॉच’ या एका जालीय प्रकल्पाने केलेल्या तथाकथित सर्वेक्षणानुसार ‘देशातील द्वेषपूर्ण भाषणांचे प्रमाण वाढलेले आहे. महाराष्ट्रात वर्ष २०२३ मध्ये सर्वाधिक द्वेषपूर्ण भाषणे झालेली आहेत’, असे हे सर्वेक्षण सांगते. ‘वर्ष २०२३ किंवा २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्या राज्यांत ७० टक्के ‘द्वेषपूर्ण भाषणे’ नोंदवण्यात आली आहेत’, असा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. हा जालीय प्रकल्प फक्त हिंदूंनी मुसलमान समाज अथवा व्यक्ती यांच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्यांचा संकलन करतो. त्यामुळे हे निष्कर्ष फक्त हिंदूंनी मुसलमानांच्या विरोधात केलेली द्वेषपूर्ण भाषणे दाखवतात. भारतीय प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या वाचक वर्गासमोर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणलेले आहेत.
२. द्वेषयुक्त भाषणाचा हेतू
द्वेषयुक्त भाषण हे कुणीही कुणाच्याही विरोधात केले, तरी ते वाईटच असते. त्याचे समर्थन अथवा बचाव करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामागे जमावाला एखादा समाज अथवा व्यक्ती यांच्या विरोधात चिथावून हिंसा करण्याचा अथवा आयुष्यातून उठवण्याचा वाईट हेतूही असू शकतो. १९८० च्या दशकापासून अशा हिंसेच्या सावटात रहाणार्या आणि साधारण २ वर्षांपूर्वी हिंसेला सामोरे जाऊन स्वत:चा एक डोळा गमावणारे लेखक सलमान रश्दींपासून नूपुर शर्मा आणि अगदी अलीकडे सिद्ध केलेल्या खोट्या बातमीमुळे स्वत:सह कुटुंबियांचा जीव धोक्यात आलेला श्रीनगरच्या ‘एन्.आय.टी.’मधील प्रथमेश शिंदे अशी अनेक उदाहरणे असू शकतात; पण अर्थात् ती मुसलमान समाजाच्या विरोधातील नसल्याने ‘हिंदुत्व वॉच’ या संस्थेने ती सर्वेक्षणात घेतलेली नाहीत. (इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, सलमान रश्दी हे जरी जन्माने इस्लाम धर्मीय असले, तरी ते निधर्मी आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणारे हे मुसलमान समाजाचे घटक असल्याने ते मुसलमानांच्या विरोधातील द्वेषयुक्त भाषण ठरत नाही.)
३. द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) कशाला म्हणतात ?
‘द्वेषयुक्त भाषण’ या शब्दाचा व्यावहारिक आणि कायदेशीर अर्थ देशानुरूप पालटतो. अमेरिकेत राज्यघटनेने पूर्ण भाषणस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य दिले असल्याने राष्ट्रीय पातळीवर द्वेषयुक्त भाषणाच्या संदर्भात प्रत्यक्ष कायदे नाहीत. युरोपीय महासंघ आणि भारत येथे द्वेषयुक्त भाषणाच्या संदर्भात काही कायदे आहेत. प्रामुख्याने जर एखाद्याच्या वक्तव्यातून समाजात एखाद्या विशिष्ट गटाच्या विरोधात द्वेष पसरवण्याचा अथवा हिंसाचार घडवून आणण्याचा उद्देश दिसला, तर ते द्वेषयुक्त भाषणाच्या गुन्ह्याच्या अंतर्गत येते. भारतात १५३ (अ) आणि २९५ (अ) या कलमांच्या अंतर्गत द्वेषयुक्त भाषणाच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी ३ ते ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
४. ‘हिंदुत्व वॉच’ संकेतस्थळाच्या संशोधनाचा (?) पाया आणि त्रुटी
द्वेषयुक्त भाषणाच्या संदर्भातील हे कथित संशोधन ‘डेटा स्क्रॅपिंग’ (data scrapping – ही सार्वजनिकरित्या उपलब्ध विविध संकेतस्थळांच्या स्रोतांमधून माहिती काढण्याची प्रक्रिया आहे.) पद्धतीने वापरते. त्यांना ज्या वृत्तपत्र संस्था दखलपात्र वाटतात, त्यांचा आधार घेण्यात आला आहे. याचा अर्थ त्यांना जे योग्य वाटले अथवा सोयीस्कर वाटले, त्यांचे संदर्भ घेण्यात आले आहेत.
या तथाकथित संशोधनात भारतीय कायद्यानुसार असलेली व्याख्या न वापरता, संयुक्त राष्ट्रांची द्वेषयुक्त भाषणाची जी व्याख्या आहे ती वापरतात. याचाच अर्थ जे कदाचित् भारतीय राज्यघटनेनुसार गुन्हे ठरणार नाहीत, ते कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या व्याख्येनुसार ठरतील. थोडक्यात सांगायचे, तर यांना भारतीय कायदे पूर्ण मान्य करायचे नाहीत.
या संकेतस्थळाचा अहवाल पुढे लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, ‘आर्थिक (इकॉनॉमिक) जिहाद वगैरे शब्दांत वर्गीकरण करत असे शब्द ज्या भाषणात आले असतील, त्या प्रत्येकाला ‘द्वेषयुक्त भाषण’ म्हणतो. मग ते कायद्यानुसार द्वेषयुक्त भाषण असो अथवा नसो. या अहवालात प्रत्यक्ष हिंसाचाराला अथवा हिंसेला परावृत्त करणारी भाषणेसुद्धा घेतली आहेत, ती द्वेषयुक्त भाषणे नक्कीच ठरू शकतात; परंतु याला एकीकडे संशोधन म्हणायचे आणि एक समुदाय दुसर्या समुदायातील व्यक्तीच्या वक्तव्यामुळे फसली आहे, हे सिद्ध करतांना त्या संपूर्ण समुदायासच (इथे हिंदूंना) दोषी ठरवायचे. ते करतांना जे काही संशोधन केले आहे, त्याची ना धड माहिती (डेटा) घोषित केली, ना कुठल्या वृत्तसंस्थांचे साहाय्य घेतले आहे, ते सांगितले आहे, म्हणजे या संशोधकांनी जे लिहिले, ते कुठलेही प्रश्न न विचारता खरे मानायचे.
आणखी एक महत्त्वाचे, म्हणजे हे सर्व एकतर्फी ठरवलेले द्वेषयुक्त भाषण आहे, म्हणजे हिंदूंच्या अथवा मुसलमानेतर धर्मियांच्या विरोधात जी काही द्वेषयुक्त भाषणे झाली, ती किती आहेत ? ती करणारे कोण आहे ? वगैरे कोणतेही तौलनिक निरीक्षण नाही. मग प्रश्न पडतो की, असे का चालू असावे ? त्यासाठी हा प्रकल्प आणि त्याच्याशी कोण संबंधित आहे ? हे पहावे लागेल. या संशोधनात पॅरिसमधून आरुषी श्रीवास्तव नावाची नव्याने पत्रकार झालेली एक पत्रकार, तसेच अभ्युदय त्यागी हा कोलंबिया विद्यापिठात ‘पीएच्.डी.’ करणारा विद्यार्थी सहभागी होते. त्या सर्वांच्या, तसेच संशोधनाच्या व्ययासाठी नक्की कुणी अनुदान केले ? हे घोषित केलेले नाही. थोडक्यात त्यात काही conflict of interest (स्वारस्य) आहे का ? हे गुप्त ठेवण्यात आले आहे.
५. ‘हिंदुत्व वॉच’ नक्की कुणाचा प्रकल्प ?
‘हिंदुत्व वॉच’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात सांगायचे, तर ‘हिंदुत्व वॉच’ ही कुठलीही अधिकृत संस्था नाही. त्यांच्या प्रकल्पामध्ये हे गृहीत धरलेले आहे की, हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ हे आतंकवादी विचारांचे आहेत. या संस्थेच्या नावात ‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ हे शब्द जणू काही शिवी असल्यासारखे वापरलेले दिसतात. त्यात ‘W’ हा शब्द काढण्यासाठी हिंदूंना पवित्र असलेला ‘त्रिशूळ’ हा उपहासाने वापरण्यात आला आहे.
जसजशा वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसतसे असे धूळफेक करणारे प्रकल्प अधिकाधिक दिसू लागतील. ‘जालीय माहिती युद्धा’च्या काळात समाजात जशा अपसमज पसरवणार्या संघटना आणि योजना वाढीस लागल्या, तशाच त्यांच्याविषयीची माहिती काढून वास्तव जगापुढे आणणार्या संघटना अन् योजनाही सिद्ध झाल्या आहेत, ज्यांचा उद्देश ‘कुठलेही अपसमज न्यून करणे, दुही टाळणे आणि समाजाला वास्तवातील हितशत्रू कोण आहेत ?’, हे दाखवून देणे असा असतो.
‘ट्विटर’ या (आता ‘एक्स’ नावाने ओळखल्या जाणार्या) समाजमाध्यमात ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ (अपप्रचार) या नावाने असाच एक प्रकल्प आहे, जे विविध प्रकारच्या चुकीच्या माहितीवर प्रकाश टाकतो आणि त्यांचे बोलवते धनी कोण आहेत ? हे दाखवून देतो.
‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ने ‘हिंदुत्व वॉच’ प्रकल्पाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी संशोधन केले. त्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांत आलेली माहिती, त्यातून दिसलेले संदर्भ वगैरे एकत्र केले अन् एखाद्या कोड्याचे तुकडे एकत्र आणून ते सोडवावे तसे आणले. त्यातून सिद्ध झालेले चित्र पुढील लिंकवर वर उपलब्ध आहे.
(संदर्भ : – https://x.com/DisinfoLab/status/1708108425669001718?s=20)
६. ‘हिंदुत्व वॉच’च्या मागे बोलवता धनी पाकिस्तान
थोडक्यात सांगायचे झाले, तर रकीब नाईक हा प्रमुख असलेल्या ‘हिंदुत्व वॉच’ची तांत्रिक बाजू पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ‘पाकिस्तानी मुस्लीम लीग’शी संबंधित असलेले आदिल कयानी हे बघतात. केवळ पाकिस्तानी राजकीय पक्ष ‘मुस्लीम लीग’शी संबंधित असणे इतकीच कयानी यांची माहिती नाही, तर ते ‘भारतविरोधी अपप्रचार आणि काश्मीरमधील फुटीरतेला खतपाणी घालण्ो’, यांसाठी माहितीतंत्र वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. काश्मीर स्वतंत्र करण्यावरून त्यांनी ट्विटरवरही जाहीर वक्तव्ये केली आहेत. या व्यतिरिक्त ‘ईशान्य भारतातील राज्यांच्या संदर्भात आणि अगदी मध्यप्रदेशलाही स्वतंत्र करा’, अशी या महाशयांची वक्तव्ये आहेत. थोडक्यात हेसुद्धा ‘तुकडे तुकडे’ टोळीच्या पठडीतील आहेत.
आदिल कयानी हे ‘सायरस कयानी’ या नावाने भारतविरोधी पाकिस्तानी संकेतस्थळ ‘ग्लोबल व्हिलेज स्पेस’ चालवत होता. ‘हिंदुत्व वॉच’ संकेतस्थळाचा प्रमुख असलेला रकीब नाईक हा आधी आणखी एक भारतविरोधी संकेतस्थळ ‘twocircles.net’ याच्याशी संलग्न होता. या संकेतस्थळाचा संस्थापक काशीफ अल् हुदा याचे लेखन आणि ट्वीट्स भारतविरोधी असतातच. या व्यतिरिक्त हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक आणि ‘सिमी’ या भारतात बंदी घातलेल्या जिहादी संघटनेशी काशीफ हुदाचा संबंध असल्याचेही लक्षात येऊ शकते. ‘twocircles.net’ संकेतस्थळाचे लेखन आदिवासी, दलित, भारतीय मुसलमान, स्त्री वर्ग अशा समाजात विभागले गेले आहे. याच संकेतस्थळाचा संपादक इरफान मेहराज हा आतंकवादी कारवायांमुळे ‘यूएपीए’च्या (बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमाच्या) अंतर्गत अटकेत आहे. एकूण रंग बघता भारतविरोधी मत सिद्ध करून समाज आणि पर्यायाने देश तोडण्याचा प्रयत्न दिसतो. ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ने सिद्ध केलेला तक्ता यावर अधिक प्रकाश टाकतो, तो पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
(संदर्भ : https://x.com/DisinfoLab/status/1708108459651236280?s=20)
थोडक्यात ‘हिंदुत्व वॉच’ हे संकेतस्थळ रकीब नाईक एकतर प्रत्यक्ष जाहीरपणे भारतविरोधी असलेल्या पाकिस्तानी व्यक्तींच्या अथवा भारतातील भारतविरोधी विचारांच्या व्यक्तींच्या सक्रीय सहभागाने चालवत आहे. रकीबने वर्ष २०२० नंतरच भारतातून पलायन करून अमेरिकेत रहाणे पसंत केले आहे. तो ‘भारतात आणि एकूणच हिंदूंकडून धोका आहे’, असा कांगावा करत असतो.
७. नकारात्मक बातम्या पसरवून हिंदु, भारत आणि केंद्र सरकार यांच्याविरोधी डाव
यामध्ये हिंदुविरोध, भारतविरोध, मोदी-भाजपविरोध असे कुठलेही कारण असू शकते. असे वाटायचे कारण, म्हणजे या अहवालाला आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मिळालेली प्रसिद्धी ! त्यात ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘ब्लूमबर्ग’, ‘रॉयटर्स’, ‘बीबीसी’ आदी अनेक माध्यमे आहेत. अशा माध्यमात येणार्या गोष्टी अनेकदा अमेरिकेतील आणि जगातील अनेक राजकारणी अन् उद्योजक आदी गांभीर्याने घेतात. ‘जरी अशा एकाच बातमीने काही पालटणार नसले, तरी अशा हळूहळू नकारात्मक बातम्या सातत्याने पेरत राहिले, तर परिणाम होऊ शकतो’, असा डाव असू शकतो.
एक नक्की की, ‘येनकेन प्रकारेण अपसमज पसरवत भारतात विविध प्रकारची अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा’, हाच उद्देश असू शकतो. थोडक्यात अशा प्रकारचा अशास्त्रीय अहवाल हाच हिंदु, भारत आणि मोदी-भाजप यांच्या विरोधात एक ‘हेट क्राईम’ (द्वेषयुक्त गुन्हा) आहे, असे म्हणावे लागते. पाश्चात्त्य माध्यमांनी असे काही छापून आणले की, त्यावर सारासार विचार न करता जर भारतीय व्यक्ती, संस्था आणि माध्यमे विचार करत असतील अन् पसरवत असतील, तर याचा अर्थ एकतर तेही आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्यादे झाले आहेत अथवा काळाच्या ओघात विश्लेषण न करता नुसत्या ‘कॉपी आणि पेस्ट’ करून बातम्या देऊ लागले आहेत, असे म्हणावे लागेल.
– विवेक सत्यवादी
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’)